esakal | कांदाभावात क्विंटलला ५०० रुपयांची घसरण
sakal

बोलून बातमी शोधा

onion

Nashik : कांदाभावात क्विंटलला ५०० रुपयांची घसरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उन्हाळ कांद्याचा किलोचा भाव ४० ते ४२ रुपयांपर्यंत पोचल्यामुळे निर्यातबंदीच्या अफवेचे पडसाद मंगळवारी (ता. ५) जिल्ह्यातील काही बाजारपेठांमध्ये उमटले. सकाळच्या सत्रात क्विंटलच्या भावात एक हजार रुपयांची घसरण झाली. त्याचवेळी साठवलेल्या उन्हाळ कांद्याची आवक वाढली असल्याने दुपारनंतर भावात काहीशी वाढ झाली. तरीही दिवसभरात क्विंटलच्या भावात पाचशे रुपयांची घसरण राहिली.

मनमाडमध्ये सरासरी भावातील घसरण क्विंटलला ७०० रुपयांपर्यंत चोवीस तासात पोचली होती. सोमवारच्या तुलनेत आज शेतकऱ्यांना कळवणमध्ये ४५०, चांदवडमध्ये ५०, सटाण्यात सव्वाशे, तर नामपूरमध्ये २५० रुपयांनी कमी भाव मिळाला.

बाजारपेठेत काहीसे स्थीर, पिंपळगावमध्ये १६४, तर देवळ्यात शंभर रुपयांनी सरासरी भाव अधिकचा मिळाला. दरम्यान, कांद्याच्या भावात कृत्रीम पद्धतीने तेजीचे वातावरण तयार करण्यात आले आहे काय? असा प्रश्‍न चढ-उतारावरुन शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. शिवाय देशांतर्गत मागणीचा विचार करता, येत्या काही दिवसांमध्ये क्विंटलचा भाव साडेतीन हजाराच्या आसपास राहण्याची चिन्हे दिसताहेत. लासलगावमध्ये नवीन लाल कांद्याच्या भावात २४ तासात क्विंटलमागे सरासरी ६० रुपयांनी वृद्धी झाली.

लासलगावमध्ये नवीन लाल कांद्याला सोमवारी (ता. ४) सरासरी क्विंटलला २ हजार ३४० रुपये असा भाव मिळाला. आज हा कांदा २ हजार ४०१ रुपये क्विंटल या सरासरी भावाने विकला गेला. निर्यातदारांनी कर्नाटकमधून नवीन कांद्याची खरेदी अडीच हजार रुपये क्विंटल या सरासरी भावाने केली आहे. हा कांदा जिल्ह्यात आणून फिलीपाईन्ससाठी ५८० डॉलर प्रती टन या भावाने निर्यात करण्यात येत आहे.

हेही वाचा: "विकासाबाबत राज्यकर्त्यांना काही कळत नाही"

मुंबईमध्ये हजाराची उसळी

मुंबईमध्ये मात्र कांद्याच्या भावाने क्विंटलला एक हजार रुपयांनी उसळी घेतली. सोमवारी (ता. ४) सरासरी २ हजार ५० रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला होता. आज इथे त्यास ३ हजाराचा भाव मिळाला. दक्षिणेसोबत राजस्थान आणि मध्यप्रदेशमधून नवीन कांद्याची आवक वाढण्यासाठी आणखी पंधरा दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. तोपर्यंत नाशिकच्या साठवलेल्या उन्हाळ कांद्याला देशांतर्गत मागणी राहण्याची चिन्हे दिसताहेत. मात्र, ‘पॅनीक सेलींग’’कडे शेतकऱ्यांचा कल वाढला आणि वाढलेला भाव मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणल्यास भावाचे गणीत बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. देशांतर्गत मागणी वाढल्याने निर्यातीकडील कल काहीसा कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

loading image
go to top