
Onion Crisis : राज्यात गेल्या वर्षीपेक्षा कांदा उत्पादनात 22 लाख टनांनी घट; ऑक्टोबर ते डिसेंबर रडवणार
Onion Crisis : राज्यात गेल्या वर्षी पाच लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ कांद्याची लागवड झाली होती. यंदा पाच लाख ५३ हजार हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड झाली होती.
अर्थात, गेल्या वर्षी अगोदर ४२ हजार हेक्टर कमी क्षेत्रावर उन्हाळ कांद्याची लागवड झाली असून, गेल्या महिन्याखेरच्या पाऊस आणि गारपिटीमध्ये ७२ हजार २०० हेक्टरवरील कांद्याचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
म्हणजेच, गेल्या वर्षीपेक्षा यंदा एक लाख १४ हजार २०० हेक्टरवर उन्हाळ कांद्याचे उत्पादन कमी होणार असून, हेक्टरी मिळणाऱ्या २० टन उत्पादनाच्या आधारे गेल्या वर्षी यंदा २२ लाख टनांनी उत्पादनात घट येण्याचे चित्र दिसत आहे. (Onion production in state decreased by 22 lakh tonnes compared to last year problem from October to December nashik news)
लागवड क्षेत्राच्या तुलनेत पाऊस आणि गारपिटीमध्ये राज्यातील बाधित झालेले क्षेत्र १३ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. या नुकसानीमुळे १४ लाख ४४ हजार टनांनी कमी होणाऱ्या उत्पादनाचा समावेश राज्यातील एकूण कमी उत्पादनात समाविष्ट आहे.
उन्हाळ कांद्याच्या लागवडीतील घटीची स्थिती राज्यासारखी देशात पाहावयास मिळत आहे. देशामध्ये गेल्या वर्षी ११ लाख ६७ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा हीच लागवड ६४ हजार हेक्टरनी कमी क्षेत्रावर म्हणजे, ११ लाख तीन हजार हेक्टरवर झाली आहे.
अर्थात, कमी झालेल्या क्षेत्राची हेक्टरी १९.६ टन उत्पादनाशी तुलना केली असता, १२ लाख ५४ हजार टनांनी देशात यंदा गेल्या वर्षी कमी उत्पादन होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील अगोदरच गेल्या वर्षीपेक्षा ४२ हजार हेक्टरनी कमी क्षेत्रावर लागवड झाल्याने घटणाऱ्या आठ लाख ४० हजार टनाचा समावेश आहे.
शेती अभ्यासकांशी झालेल्या संवादात एक मुद्दा अधोरेखित झाला तो म्हणजे, उन्हाळ कांदा सर्वसाधारणपणे डिसेंबरपर्यंत साठवणूक ठेवला जातो; परंतु यंदा सप्टेंबरअखेरपर्यंत उन्हाळ कांदा टिकेल की नाही? असा प्रश्न तयार झाला आहे. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये कांदा रडवणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शेती अभ्यासकांची निरीक्षणे
शेतकऱ्यांना कांदा विकणे परवडत नाही, अशा काळात कांद्याच्या निर्यातीचा आलेख उंचावत जातो. एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत २२.७ लाख टन कांद्याची निर्यात झाली होती.
अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत ही निर्यात ६८ टक्क्यांनी अधिक आहे. शिवाय गेल्या वर्षी देशात उन्हाळ कांद्याची उत्पादकता हेक्टरी १९.६ टन मिळाली. ती यंदा १७ टनापर्यंत घटण्याची शक्यता अभ्यासकांना वाटते आहे.
अगोदर गेल्या वर्षीपेक्षा कमी उत्पादन, त्यात टिकवण क्षमतेचा प्रश्न आणि गुणवत्ता खराब होण्याची चिन्हे, अशा तीन समस्यांमुळे अभ्यासकांना ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कांद्याचा तुटवडा होईल, अशी शक्यता भेडसावू लागली आहे.
कांदा लागवडीस प्रोत्साहनाची अपेक्षा
बाजारपेठेतील भावातील तीव्र चढ-उतारामुळे उत्पादन खर्चाएवढे पैसे मिळत नसल्याने कांदा उत्पादनाकडील कल कमी होत चालल्याचे लागवड क्षेत्रावरून दिसत आहे. अशातच, अवकाळी पाऊस आणि गारपीट कांद्याचे नुकसान करत आहे.
अशा परिस्थितीमध्ये कांदा लागवडीसाठी यंदाच्या खरिपामध्ये शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने प्रोत्साहन देण्याची गरज शेती अभ्यासकांनी नोंदविली आहे. त्याचा एक भाग म्हणून बियाण्यांसाठी अनुदान देण्याचा विचार सरकार करू शकते, असेही अभ्यासकांचे म्हणणे आहे.