Onion Rates: कांदा आगारात वर्षाआड चांगल्या भावाची परंपरा यंदा खंडित! लासलगाव, पिंपळगावमध्ये मिळाले 750 रुपये | Onion Rates fall tradition of year good prices in onion market broken this year 750 received in Lasalgaon Pimpalgaon nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

onion rate

Onion Rates: कांदा आगारात वर्षाआड चांगल्या भावाची परंपरा यंदा खंडित! लासलगाव, पिंपळगावमध्ये मिळाले 750 रुपये

Onion Rates : कांदा आगारात वर्षाआड चांगला भाव मिळण्याची पाच वर्षांची परंपरा राहिली. मात्र यंदा चांगल्या भावाची शाश्‍वती नसल्याने ही परंपरा खंडित झाली आहे. लासलगाव बाजार समितीत सोमवारी (ता. २२) क्विंटलचा सरासरी भाव ८०० रुपये राहिला.

तसेच पिंपळगाव बाजार समितीत मंगळवारी (ता. २३) ९५१ रुपये क्विंटल, असा उन्हाळ कांद्याला सरासरी भाव मिळाला होता. तो घसरत शुक्रवारी (ता.२६) ७५० रुपयांपर्यंत पोचला. लासलगावलाही क्विंटलचा सरासरी भाव ७५० रुपये होता. (Onion Rates fall tradition of year good prices in onion market broken this year 750 received in Lasalgaon Pimpalgaon nashik news)

लासलगाव बाजार समितीत २०१८-१९ मध्ये ३७ लाख ५१ हजार ७८२ क्विंटल कांद्याची विक्री झाली. त्यास ७०० रुपये क्विंटल असा सरासरी भाव मिळाला होता. त्यात मेमधील पाच लाख ८२ हजार २४० क्विंटल कांद्याचा समावेश असून, त्यास सरासरी ६३३ रुपये असा भाव मिळाला.

२०१९-२० मध्ये ३३ लाख २२ हजार २३३ क्विंटल कांद्याची विक्री दोन हजार ८५० रुपये क्विंटल या सरासरी भावाने झाली होती. त्यात मेमधील सव्वापाच लाख क्विंटल कांद्याला सरासरी मिळालेल्या एक हजार तीन रुपये भावाचा समावेश होता.

२०२०-२१ मध्ये ४२ लाख ९४ हजार ५८७ क्विंटल कांद्याची विक्री सरासरी एक हजार ९४२ रुपये क्विंटल या भावाने झाली होती. त्यात मेमधील चार लाख ३५ हजार ७६१ क्विंटलचा सरासरी भाव ६४० रुपये इतका होता.

२०२१-२२ मध्ये ४५ लाख ५८ हजार ४६२ क्विंटल कांद्याची सरासरी एक हजार ८३२ रुपये क्विंटल भावाने विक्री झाली. त्यापैकी मेमधील पाच लाख १९ हजार ७७४ क्विंटल कांद्याला मिळालेला सरासरी भाव एक हजार ४०५ रुपये होता.

वर्षभरात ५७ लाख दोन हजार ७१० क्विंटल उन्हाळ कांद्याची विक्री झाली होऊन त्यास सरासरी एक हजार २२४ रुपये भाव मिळाला. गेल्या वर्षी मेमध्ये सात लाख आठ हजार ५६० क्विंटल कांदा सरासरी ८३९ रुपये क्विंटल भावाने विकला गेला.

ही पाच वर्षांची आकडेवारी पाहता स्वाभाविकपणे यंदाच्या मेमध्ये गेल्या वर्षीपेक्षा अधिक भाव मिळण्याची अपेक्षा होती. मात्र या महिन्यात आजअखेर लासलगाव बाजार समितीत सात लाख ३९ हजार ८६ क्विंटल कांद्याची विक्री झाली असून, त्यास सरासरी ७५३ रुपये भाव मिळाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आवक कमी

उन्हाळ कांद्याची लासलगाव बाजार समितीत गुरुवारी (ता. २५) ३० हजार क्विंटलहून अधिक आवक झाली होती. या कांद्याला सरासरी ६७५ रुपये क्विंटल असा भाव मिळाला होता. शुक्रवारी (ता. २६) येथे सुमारे १७ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील आवकेचा आढावा घेतला असता, शुक्रवारी आवक आणि कांद्याचे भाव कमी राहिल्याचे चित्र दिसले. भावाची स्थिती अशी का उदभवली, याची माहिती घेतल्यावर बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या कांद्यापैकी पावसात भिजलेल्या कांद्याचा समावेश असल्याने भावाची शाश्‍वती राहिली नसल्याचे सांगण्यात आले.

बांगलादेश, ‘नाफेड’वर भिस्त

बाजारात खरेदी केलेल्या कांद्यापैकी २० टक्के कांदा पावसात भिजल्याने अधिक टिकत नसल्याचे व्यापाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यातच, अजूनही बांगलादेशने कांद्याची आयात अद्याप सुरू केलेली नाही.

बांगलादेश सरकारच्या वित्त विभागाने आयातीला हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र भारताचे कांदा निर्यातीचे धोरण धरसोडी वृत्तीचे राहिल्याने बांगलादेश सरकारच्या कृषी विभागाने ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका स्वीकारल्याची माहिती निर्यातदारांपर्यंत धडकली आहे.

बांगलादेशची आयात सुरू होण्यासोबत ‘नाफेड’तर्फे खरेदी सुरवात केल्यावर मात्र स्थानिक बाजारातील कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांना वाटत आहे.

टॅग्स :Nashikonion