
Nashik Cyber Crime : ऑनलाईन ‘बबली’ने एकाला घातला 34 लाखांना गंडा
Nashik Cyber Crime : लग्न जुळविण्याच्या एका संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर संशयित बबलीने गंगापूर रोड परिसरातील ५२ वर्षीय व्यक्तीला कस्टममध्ये अडकल्याने पाऊंडच्या बदल्यात रुपये भरण्यासाठी ३४ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Online Girl cheated man for 34 lakhs Nashik Cyber Crime )
नितीनकुमार तुकाराम भामरे (रा. रामेश्वरनगर, आनंदवल्ली) यांच्या फिर्यादीनुसार, शादी डॉट कॉम या विवाह जुळविण्याच्या संकेतास्थळावरून त्यांची ब्रिटनमध्ये स्थित उषा कडक सिंग हिच्याशी ओळख झाली होती.
त्यानंतर सोशल मीडियावरील व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून त्यांच्याच चॅटींग सुरू झाली. त्याचप्रमाणे मेलद्वारेही त्यांचा संपर्क वाढला होता. दरम्यान, संशयित उषा हिने आपल्याला महाराष्ट्रात व्यवसाय सुरू करावयाचा असल्याचे भामरे यांना सांगितले.
त्यानुसार तिने काहीतरी वस्तू पाठविली असता ती कस्टमच्या कचाट्यात अडकली. ती सोडविण्यासाठी तिने भामरे यांच्याकडे आर्थिक मदत मागितली. त्यांनी ती केली. केलेल्या मदतीची रक्कम त्यांना परतही मिळाली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यातून संशयित बबलीने भामरे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिने भारतात आली असता, इंमिग्रेशन विभागाच्या ताब्यात असल्याचे भामरे यांना सांगितले. तिच्याकडे पाऊंडमध्ये चलन असून, ते याठिकाणी चालत नाही.
त्यासाठी भारतीय व्यक्तीच्या बँक खात्याची आवश्यकता असल्याचे सांगत तिने पुन्हा भामरे यांच्याकडे मदत मागितली. त्यानुसार भामरे यांनी संशयितेला बँक खात्याची माहिती दिली असता, तिने बँक खात्यावरील ३४ लाख २५ हजार ३०० रुपयांची रक्कम भरण्यास भाग पाडून भामरे यांची फसवणूक केली.
सदरचा प्रकार ५ जानेवारी ते ६ मार्च यादरम्यान घडला आहे. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसात माहिती तंत्रज्ञान कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.