
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या सभेत अडचणी निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न : अद्वय हिरे
मालेगाव : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या २६ मार्चला येथे होणारी शिवगर्जना सभा न भुतो न भविष्यती असेल. या सभेस अडचणी निर्माण करण्याच्या कुटिल उद्देशाने विरोधक यांनी शहराच्या प्रवेश मार्गांवर जागो-जागी खड्डे खोदून अडथळा निर्माण केला आहे. विरोधकांच्या या मनोवृत्तीची कीव करावी वाटते. खड्डे खोदणाऱ्यांना जनता जागा दाखवेल असे शिवसेना (Shivsena) उपनेते अद्वय हिरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
श्री. हिरे यांनी पत्रकात विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याने त्यांनी सभेस अडथळा आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा चालवली आहे. शहरात येणाऱ्या चारही बाजूचे मुख्य रस्ते खोदून रहदारीस अडथळा निर्माण करण्यासाठी बॅरिकेट्स लावण्याचा व वाहतुकीची कोंडी करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे.
याबद्दल शिवसेना कार्यकर्ते व सामान्य नागरिक याबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. अशातच सभेच्या प्रचाराचे लावण्यात आलेले बॅनर्स फ्रेमसह चोरले जात आहेत. सभेची तयारी पाहून काही विरोधक अप्रिय घटना घडवून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करत आहेत. जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
शनिवारी (ता.२५) सकाळी दहाला शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या हस्ते व खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत रॉयल हब व्यापारी संकुलातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याचे श्री. हिरे यांनी कळविले आहे. यावेळी उपनेते सुनील बागूल, संपर्क प्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, पवन ठाकरे आदींसह जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यास कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री. हिरे यांनी केले आहे.