Nashik Panjarpol News: आमदार हिरेंच्या धक्कातंत्रामागे ‘पांजरापोळ’? | Opposition to Panjarpol said to be reason behind shock tactic unleashed on ruling BJP MLA seema hire nashik political news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Seema Hirey. Devyani Farande & Dhananjay Bele

Nashik Panjarpol News: आमदार हिरेंच्या धक्कातंत्रामागे ‘पांजरापोळ’?

Nashik Panjarpol News : निमाच्या औद्योगिक प्रदर्शनात आमदार सीमा हिरे यांना धक्का देऊन अपमानास्पद वागणूक दिल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे.

राज्यातील सत्ताधारी भाजपच्या आमदारांवर उगारलेल्या धक्कातंत्राच्या अस्रामागे पांजरपोळच्या जागेला झालेला विरोध कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. (Opposition to Panjarpol said to be reason behind shock tactic unleashed on ruling BJP MLA seema hire nashik political news)

त्यामुळे धक्का प्रकरण प्रदर्शन भरविणाऱ्यांना जड जाणार असल्याचे दिसत असले तरी भाजपच्याच एका आमदाराचा पांजरपोळच्या जागेला पाठिंबा असल्याने दोन आमदारांमधील लढाई तर नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणाने भाजप मध्ये सरळ दोन गट तयार झाले आहे. तर पांजरपोळच्या विषयात कुठली भूमिका घ्यायची यावरून शिंदे गट सावध झाला आहे.

उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या ‘निमा’ संस्थेतर्फे नुकतेच औद्योगिक प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनाच्या उद्‌घाटनाचा एक व्हीडीओ समोर आला आहे. त्यात पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांना उद्‌घाटनाची रिबीन कापताना निमाचे अध्यक्ष व निमंत्रक धनंजय बेळे यांच्याकडून धक्का देण्यात आला.

या अपमानास्पद वागणुकीनंतर आमदार हिरे उद्‌घाटन स्थळावरून निघून गेल्या. वास्तविक प्रदर्शनाला उपस्थित असलेले उद्‌घाटक उद्योग मंत्री उदय सामंत व पालकमंत्री दादा भुसे यांनी आमदार हिरे यांची मध्यस्ती करणे अपेक्षित होते.

परंतु त्यांनी कार्यक्रम झाल्यानंतर मोबाईलवरून संपर्क साधून प्रकृतीची विचारपूस केली. या प्रकारानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी निमा कार्यालयात बेळे यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून कार्यालयाबाहेर आंदोलन केल्यानंतर प्रकरण तापले आहे.

परंतु, स्थानिक आमदारांना निमंत्रण न देण्यापासून ते व्यासपीठावर धक्का देणे या लाजिरवाण्या प्रकारामागे पांजरापोळचे राजकारण समोर येताना दिसते आहे.


हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विरोधाचे राजकारण

हिरवाईने नटलेल्या पांजरापोळची जागा ताब्यात घेऊन त्यावर औद्योगिक वसाहत उभारावी यासाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यासह औद्योगिक संघटनांची मागणी आहे. त्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे बैठक देखील झाली.

परंतु पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शविल्यानंतर पांजरापोळच्या जागेचे सर्वेक्षण करावे. त्यात वृक्षसंपदा व प्राणी यासंदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना दिल्या होत्या.

वृक्षसंपदेच्या नाशासह पश्चिम मतदारसंघात ढवळाढवळ होत असल्याने आमदार हिरे यांनी उद्योगमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोध दर्शविला. हिरेंच्या विरोधाला भाजपच्या शहरातील प्रमुख नेत्यांनी साथ दिली.

त्यामुळे पांजरपोळच्या जागेचे घोंगडे अद्यापही भिजतं असून कारखानदारांच्या मनसुब्यावर पाणी फेरले. त्यातून औद्योगिक प्रदर्शनाला निमंत्रित न करण्यापासून ते धक्का देण्यापर्यंतची कृती झाल्याचे बोलले जात आहे.

हिरे का गेल्या?

स्थानिक आमदार म्हणून हिरे यांना निमंत्रण देणे अपेक्षित होते. परंतु, निमंत्रण दिले गेले नाही. औद्योगिक प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी स्थानिक आमदारांची आवश्यकता असते, ही बाब आयोजकांनी दुर्लक्षित करणे अयोग्य होते.

मात्र निमंत्रण नसल्याने आमदार हिरे व्यासपीठावर का गेल्या? मतदार हिरावण्याची भीती तर नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.

शिंदे गटाचा डिवचण्याचा प्रयत्न

उद्‌घाटनाच्या व्यासपीठावर शिवसेनेच्या शिंदे गटाचे उद्योगमंत्री उदय सामंत, दादा भुसे होते. हिरे यांचा पांजरापोळला असलेला विरोध त्यांच्या देखील पचनी पडला नाही.

म्हणूनच हिरे यांना व्यासपीठावर पुन्हा बोलाविण्याची तसदी त्यांनी घेतली नाही व आमदार हिरे पडल्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून रिबीन कापण्याची झालेली घाई शिंदे गटाकडून भाजप आमदाराला डिवचण्याचा प्रकार तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे.