Water Crisis : पंचवटी गावठाण भागात दुसऱ्या दिवशीही हंडाभर पाण्यासाठी भटकंती | Panchvati Gavthan area wandering for buckets of water even on second day nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water crisis file photo

Water Crisis : पंचवटी गावठाण भागात दुसऱ्या दिवशीही हंडाभर पाण्यासाठी भटकंती

Water Crisis : पाण्याची बचत म्हणून म्हणा की तांत्रिक कामामुळे म्हणा शनिवारचा पाणीपुरवठा बंद राहिला. मात्र याची झळ दुसऱ्या दिवशीही शहरासह पंचवटी गावठाणात बसली.

रविवारीही (ता.२१) नळाला पाणी न आल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू होती. (Panchvati Gavthan area wandering for buckets of water even on second day nashik news)

पंचवटीतील गणेशवाडीसह नाग चौक, सरदार चौक, काट्या मारुती पोलिस चौकी परिसर, सहजीवननगर, शेरीमळा या गणेशवाडी परिसर हा जुना गावठाण भाग असल्याने या भागामध्ये नव्याने मोठ्या इमारतींचा विकास होत आहे.

महापालिकेच्या बांधकाम नियमावलीमध्ये राज्य शासनाने बदल केल्याने गावठाणाच्या विकासासाठी वाढीव एफएसआय दिला असून इमारतींची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे.

गणेशवाडी परिसरामध्ये भविष्याचा विचार करून मनपा प्रशासनाने जुन्या सर्व पाइपलाइन काढून जादा क्षमतेच्या अतिरिक्त पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या पाइपलाइन टाकून या परिसरातील लोकांना पाणीपुरवठा करणे अत्यंत गरजेचे आहे.

जुन्या पाइपलाइन हे गेल्या ३५ वर्षांपूर्वी टाकलेल्या असल्याने त्या कमी क्षमतेच्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कायमच पाण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत असल्याने भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता स्थानिक नागरिकांसाठी पाणी पुरवठ्याची मागणी विचारात घेत मोठ्या पाइपलाइन टाकणे गरजेचे आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विद्युत मोटारींचा वापर वाढला

कधीकाळी पंचवटीसह शहराच्या अनेक भागात एक किंवा दोन मजली घरे होती. आता अनेकांनी जुने वाडे पाडून त्याच ठिकाणी वाढीव एफएसआय मिळाल्याने टोलेजंग इमारती उभ्या केल्या आहेत.

या ठिकाणी अर्थातच पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दुसरीकडे जुन्या व जीर्ण झालेल्या पाइपलाइन तशाच आहेत. पाण्याची वेळ झाल्याबरोबर ज्यांच्याकडे विद्युत मोटारी आहेत, ते मोटारींद्वारे अधिकचे पाणी खेचून घेतात, त्यामुळे ज्यांच्याकडे विद्युत मोटारी नाहीत, तेथील पाणीपुरवठा बंद होऊन जातो.

ज्यावेळी मोटारी बंद होतील, तेव्हाच संबंधित ठिकाणी पाणी येते. सर्वच ठिकाणी अधिक दाबाने पाणीपुरवठा झाल्यास हा प्रश्‍न सुटू शकेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

"गणेशवाडी परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून नळाला थेंबथेंब पाणी येत आहे. मनपा प्रशासनाने किमान एकवेळतरी जादा दाबाने पाणीपुरवठा करावा."- संगीता सूर्यवंशी, पंचवटी

"गणेशवाडी परिसरातील स्थानिक नागरिकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न मनपा प्रशासनाने तत्काळ मार्गी लावून नागरिकांना सहकार्य करावे."

- सचिन दप्तरे, सामाजिक कार्यकर्ते