
Swayam Yojana : ‘स्वयंम’च्या वयोमर्यादेत वाढ! शासनाच्या निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना दिलासा
Swayam Yojana : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या मागणीची दखल घेत आदिवासी विकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा व अटी-शर्तीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
त्यानुसार कमाल वयोमर्यादा २८ वरून ३० वर्षांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. (pandit dindayal Swayam Yojana Increase in age limit of Swayam Relief to tribal students due to government decision nashik news)
राज्यात आदिवासी विकास विभागाची ४८७ वसतिगृहे असून, त्यांची विद्यार्थी क्षमता सुमारे ५५ हजार इतकी आहे. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता बारावीनंतरच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या, मात्र शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना स्वयंमच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते.
संपूर्ण राज्यात स्वयंमसाठी वीस हजार विद्यार्थ्यांचा लक्ष्यांक निश्चित केला आहे. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी तालुका, जिल्हा, विभाग तसेच मोठ्या शहरांनुसार आधार संलग्न खात्यावर डीबीटीद्वारे रक्कम अदा करण्यात येते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय २८ वर्षांपेक्षा अधिक नसावे, अशी तरतूद होती. त्यामुळे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणारा आणि शिक्षणासाठी तालुका-शहर गाठणारा आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासूनच वंचित राहात होता.
याबाबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने अनेकदा आंदोलने केली. अपर आयुक्तांपासून थेट मंत्र्यांपर्यंत पाठपुरावाही केला. अखेर परिषदेच्या प्रयत्नांना यश आले असून, स्वयंमच्या लाभार्थी विद्यार्थ्यांचे कमाल वय ३० वर्ष करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदिल दाखविला आहे.