
Sinnar Bazar Samiti Election: पांगरीकरांना बाजार समितीचे यंदा लाभले 2 संचालक
Sinnar Bazar Samiti Election : पांगरी (ता. सिन्नर) गावाला सिन्नर बाजार समितीच्या निवडणुकीत एकाच वेळी दोन संचालक मिळाले आहेत. त्यात विशेष बाब म्हणजे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या शेतकरी विकास पॅनलकडून व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या जनसेवा परिवर्तन पॅनलमधून ते निवडून आले आहेत. (Pangrikar got 2 directors of Sinnar Bazar Samiti Election this year nashik news)
पांगरी खुर्दचे श्रीकृष्ण मारुती घुमरे सर्वसाधारण ग्रामपंचायत गटातून व सहकारी संस्थेतील महिला राखीव गटातून सुरेखा ज्ञानेश्वर पांगारकर सिन्नर बाजार समितीच्या संचालक झाल्या आहेत. दोन्ही गावाला एकाचवेळी दोन संचालकपद मिळण्याची पहिली वेळ आहे. त्यामुळे पांगरीकरांनी दोघांचा सत्कार केला आहे.
श्रीकृष्ण घुमरे युवा शेतकरी कार्यकर्ते असून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पुढे आले आहेत. श्री. घुमरे यांनी घोरवड घाटात राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध दराविषयी आंदोलन केले आहे.
पांगरी खुर्दला संस्कृती दूध संकलन केंद्राची उभारणी बचत गटामार्फत केली आहे. चळवळीतील श्री. घुमरे संचालक झाले आहे. पांगरी बुद्रूकचे सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर यांच्या पत्नी सुरेखा पांगारकर यांचे माहेर वडांगळीचे आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
श्री. पांगारकर यांच्या जनसंपर्काची पावती मतदारांनी दिली आहे. दोन्ही संचालक वेगवेगळ्या पॅनलकडून निवडून आले आहेत, मात्र एकमेकांचे नातलग आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत सांगवीला एकाच वेळी दोन संचालक मिळाले होते.
यंदा पांगरीकरांनी बाजी मारली आहे. पांगरी खुर्द व पांगरी बुद्रूकच्या ग्रामपंचायत प्रशासनासह विकास संस्था, सामाजिक संस्थेतर्फे घुमरे व पांगारकर यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
सरपंच संदीप शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव सालके, शंकर शिंदे, रावसाहेब शिंदे, पांगरी बु चे सदस्य संदीप पांगारकर, संतोष निरगुडे, राजाराम शिंदे, केशव शिंदे, बाबासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर पांगारकर आदी उपस्थित होते.