
Nashik Leopard News : बिबट्याचा वावर अन् शेतकरी, मजुरांना धास्ती; बंदोबस्ताची मागणी
Nashik News : काही दिवसांत कधी फटांगळ्यात तर कधी खरात वस्ती शिवारात, काहीवेळा सुकेणे रस्त्यावर तर कधी नाशिक छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बिबट्याचे दर्शन होत आहे.
यामुळे संपूर्ण 'गोदाकाठ’ परिसर धास्तावला आहे. बिबट्याच्या वावरामुळे लोक शेतात जायला घाबरत आहेत. शेतकामाला जाणाऱ्या मजुरांनीही धास्ती घेतली आहे. (People are under terror due to leopard in Shiwar village on banks of Godavari nashik news)
गोदावरी काठावरील गावातील शिवारात बिबट्यामुळे लोक दहशतीखाली आहेत. नदीकाठावरील गावात बिबट्याचा वावर लोकवस्ती ते घरांपर्यंत पोहोचल्याने नागरिक तणावाखाली आहेत. चांदोरी- नागापूर नदीकाठच्या शेतशिवारात सहा महिन्यात वरचेवर बिबट्याचे दर्शन होत आहे.
काही दिवसांपूर्वी राजोळे वस्तीवर बिबट्याचे बछड्यासह दर्शन झाले. पर्णकुटी नंबर दोनकडे अनेकांना जाताना बिबट्याचे दर्शन झाले. चांदोरी व परिसरात बिबट्या व बछड्यांची संख्या नेमकी किती, हे सांगता येत नाही. मात्र बिबट्यांच्या संख्येबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
सकाळचा व्यायामही थांबला
ऊसपट्ट्यातच बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व ग्रामस्थ दहशतीखाली आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री शेतात जावे लागते. मात्र बिबट्याच्या वावरामुळे अनेकांनी ते टाळले आहे. पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दुसरीकडे रोज सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बिबट्याच्या वावराने हे प्रमाणही कमी झाले आहे. बिबट्याबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांना व मजुरांना वरचेवर बछड्यांचेही दर्शन होत आहे. वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सावज नक्की कुणी ठेवायचे?
गेल्या काही दिवसांपूर्वी चांदोरी येथील पर्णकुटी २ परिसरात शेतकरी अन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये सावज ठेवण्यावरून तूतू मै मै सुरू झाले आहे.
पंधरा दिवस पिंजरा लावूनही कुणीही सावज न ठेवल्यामुळे बिबट्या काही पिंजऱ्यात अडकला नाही. मात्र त्रास शेतकऱ्यांना झाला. तो पिंजरा हलवत दुसरीकडे नेण्यात आला. सावज ठेवण्याचा भार नागरिकांवर का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विभागीय कार्यालय हवे
चेहेडीपासून मनमाडपर्यंत, नांदगाव, सिन्नर चांदवडचा काही भाग, संपूर्ण निफाड तालुका एवढे मोठे कार्यक्षेत्र असूनही वनविभागाकडे एकच वाहन आहे. शिवाय कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने निफाड परिसरात एक विभागीय कार्यालय व्हावे अशी मागणी चांदोरीचे सरपंच विनायक खरात यांनी केली आहे.