
PM Awas Yojana : लाभार्थ्यांवर भाड्याने घरे घेऊन राहण्याची वेळ! 4 वर्षांपासून घरकुलांची रक्कम थकीत; अखेर उपोषण
चांदवड (जि. नाशिक) : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चांदवड येथील १२० लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याने त्यांनी राहते घर तोडून घरकुल योजनेअंतर्गत बांधकाम सुरू केले.
मात्र त्यांना घरकुलाचे पूर्ण अनुदान न मिळाल्याने त्यांचे घर पूर्ण होऊ न शकल्याने या सर्व लाभार्थ्यांवर भाड्याने घर घेऊन राहण्याची वेळ आल्याने लाभार्थ्यांसह वंचित बहुजन आघाडी, रिपाईं आणि आम आदमीच्या पदाधिकाऱ्यांनी चांदवड नगर परिषदेसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केला आहे. (PM Awas Yojana Time for beneficiaries to live on rented houses Arrears of housing for 4 years Fasting agitation before nagar parishad at chandwad nashik news)
२०१८-१९ या वर्षी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चांदवड येथील लाभार्थ्यांना लाभ दिला आहे. मात्र निवड झाल्यानंतर प्रत्येक लाभार्थ्यांनी आपले राहते घर तोडून घरकुल योजनेअंतर्गत बांधकाम सुरू केले आहे.
त्याला चार वर्षे होऊन गेली. लाभार्थ्यांना आतापर्यंत एक लाख ८० हजार रुपये मिळाले आहेत. मात्र उर्वरित रक्कम न मिळाल्याने घरकुलाचे काम अर्धवट राहिले आहे. या योजनेतील लाभार्थी अत्यंत गरीब असून त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे उर्वरित बांधकाम ते पूर्ण करू शकत नाहीत.
त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून लाभार्थी भाड्याने घरे घेऊन महिन्यासाठी तीन ते चार हजार रुपये घरभाडे भरत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने लाभार्थी मेटाकुटीस आले आहेत.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
नगरपरिषदेमार्फत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांची उर्वरित रक्कम १२० लाभार्थींच्या खात्यात तत्काळ वर्ग करावी, या मागणीसाठी चांदवड तालुका वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष योगेश जगताप, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे व आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष आनंद बडोदे यांनी येथील नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करत घरकुलांची राहिलेली रक्कम तत्काळ १२० लाभार्थींच्या खात्यात वर्ग करावी या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष मंगेश केदारे, मानवाधिकार परिषदेचे तालुकाध्यक्ष आनंद बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या उपोषणास अशोक हिरे, चंद्रभान साळवे व सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा देत उपोषणकर्त्यांची भेट घेतली.