
Nashik Crime News : म्हाळदे शिवारात पोलिसांचा छापा; 5 तलवारी जप्त
मालेगाव : शहरातील म्हाळदे शिवारात सहाय्यक अधिक्षक तेगबीरसिंह संधू यांचे विशेष पथक व पवारवाडी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून अवैधरित्या लपवून ठेवलेल्या सुमारे ४ हजार ८०० रुपये किमतीच्या पाच धारदार तलवारी जप्त केल्या. पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे.
पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्हयात बेकायदेशीर विनापरवाना हत्यार बाळगणारे तसेच विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याला अनुसरून अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संधू यांना मिळालेल्या माहितीवरून रफिक दस्तगीर खान (वय ५३, रा. म्हाळदे शिवार), मोहम्मद आसिफ मोहम्मद ताहिर (वय २३, रा. दातारनगर) यांच्याकडे घरात अवैधरीत्या धारदार तलवारी लपवून ठेवल्याची माहिती मिळाली.
पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलिस नाईक इम्रान सैय्यद, दिनेश शेरावते, प्रशांत बागूल, सचिन बेदाडे, पवारवाडी पोलिस ठाण्याचे हवालदार सचिन धारणकर, राकेश उबाळे, पोलिस नाईक संतोष सांगळे, भरत गांगुर्डे, सचिन गोसावी, उमेश खैरनार, नवनाथ शेलार, विनोद चव्हाण आदींच्या दोन पथकाने छापा टाकून ही कारवाई करत पाच तलवारी जप्त केल्या. पोलिस शिपाई उमेश खैरनार यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये अवैधरीत्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.