
Nashik Police : पोलिसांनी घेतला 80 टक्के बेपत्तांचा शोध; विविध शाखांची कामगिरी
Nashik News : राज्यात बेपत्ता अल्पवयीन मुला- मुलींसह महिलांबाबत गंभीररीत्या चर्चा सुरू आहे. मात्र, नाशिक शहर पोलिसांनी गेल्या चार महिन्यांमध्ये दाखल अल्पवयीन मुलं- मुलींपैकी ९७ तर, १८ वर्षावरील महिला व पुरुषांपैकी ३९३ जणांना शोधून परत आणले आहे. (police searched for 80 percent of missing persons nashik news)
अपहरण व बेपत्ता प्रकरणी दाखल गुन्ह्यांच्या तुलनेत ८० टक्के बेपत्तांना नाशिक शहर पोलिसांनी शोधून आणले असून, यासाठी आयुक्तालयाच्या विविध शाखांनी कामगिरी नोंदविली आहे.
पालकांनी रागवल्याच्या कारणातून वा प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुले- मुली घरात न सांगता निघून जाण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. यामागे कुटुंबातील विसंवाद वा पाल्याकडे होणारे दुर्लक्ष अशी कारणे असले तरीही घर सोडून गेलेल्यांचा शोध घेण्याचे जटिल कर्तव्य पोलिस दलाला पार पाडावे लागते.
यातून अनेकदा कौटुंबिक कलहही उद्भवतो. परंतु या साऱ्यांवर मात करीत पोलिस बेपत्तांचा शोध घेतात. नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांमध्ये अल्पवयीन मुले- मुलीचे अपहरणाचे १२३ गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. संबंधित पोलिसांनी ९७ अल्पवयीन मुला- मुलींना शोधून आणले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तर, अद्यापही २६ अल्पवयीन मुला- मुलींचा शोध पोलिस घेत आहेत. त्याचप्रमाणे, गेल्या चार महिन्यात १८ वर्षावरील सज्ञान असलेले ६२० पुरुष- महिला बेपत्तांची नोंद आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. यापैकी ३९३ जणांना पोलिसांनी शोधून आणलेले आहे.
दरम्यान, सन २०२२ मध्ये ऑक्टोबरपर्यंत ४७ अल्पवयीन मुले व २११ मुलींच्या अपहरणाचे गुन्ह्यांपैकी ४२ मुले व १७२ मुली पोलिसांनी शोधल्या. तर, ६७५ पुरुषांपैकी ४९१ व ८२५ पैकी ६६९ महिलांचा शोधही पोलिसांनी घेतला आहे.
तपासातील ठळक मुद्दे
* अल्पवयीन मुलामुलींच्या हाती आलेले स्मार्टफोन
* पालक व पाल्यांतील विसंवाद
* पाल्यांच्या वर्तणूकीकडे पालकांचे दुर्लक्ष
* पाल्यांचा वाढता हट्ट; तो न पुरविल्यास पालकांमध्ये पाल्य आत्महत्या वा पळून जाण्याची भीती
* अल्पवयीन मुला-मुलींमध्ये प्रेमप्रकरण
* अल्पवयीन मुलींमध्ये मुलांच्या शानशौकीला भुलून जाण्याचे प्रमाण
* घरातून पलायन करताना दागदागिने-रोकड घेऊन जाणे
बेपत्ता गुन्हे (कंसात शोधून आणलेले)
अल्पवयीन : १८ वर्षांवरील (जानेवारी-एप्रिल २०२३पर्यंत)
महिला : १०१ (७९) : ३५८ (२३०)
पुरुष : २२ (१८) : २६२ (१६३)
एकूण : १२३ (९७) : ६२० (३९३)