Nashik: बाजारामध्ये मका अन हरभऱ्याला किमान आधारभूतपेक्षा कमी भाव! सोयाबीन, कापूसासह तूर खातेय भाव | price of maize and gram in market lower than minimum standard Soybean cotton along with tur rates hike Nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Soybean.

Nashik: बाजारामध्ये मका अन हरभऱ्याला किमान आधारभूतपेक्षा कमी भाव! सोयाबीन, कापूसासह तूर खातेय भाव

Nashik News : ‘स्मार्ट’ प्रकल्पातर्फे बाजार माहितीचे विश्‍लेषण केले जाते. त्यानुसार बाजारात मका आणि हरभऱ्याला किमान आधारभूत पेक्षा कमी भाव मिळत असल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे मात्र सोयाबीन, कापूस आणि तूर भाव खात असल्याचे बाजारपेठेतील माहिती दर्शवत आहे.

तुरीचे यंदा देशात उत्पादन कमी असल्याने केंद्र सरकारने मोफत आयात धोरण मार्च २०२४ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (price of maize and gram in market lower than minimum standard Soybean cotton along with tur rates hike Nashik news)

मक्याची किमान आधारभूत किंमत क्विंटलला १ हजार ९६२ रुपये इतकी आहे. मागील आठवड्यात नांदगावमध्ये मक्याला १ हजार ७४६ रुपये क्विंटल असा सरासरी भाव मिळाला. आज मका १ हजार ७९० रुपये क्विंटल भावाने विकली गेली.

रब्बी हंगामातील मक्याची बाजारातील आवक वाढत चालली आहे. देशामध्ये मक्याचे उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा अधिक असल्याचा तिसरा अंदाज केंद्रीय कृषी विभागाचा आहे. त्यामुळे मक्याला किमान आधारभूत किंमतीएवढा भाव मिळणार की नाही याबद्दलची शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे.

हरभऱ्याची किमान आधारभूत किंमत क्विंटलला ५ हजार ३३५ रुपये, अशी निश्‍चित करण्यात आली आहे. लातूरमध्ये मागील आठवड्यात ४ हजार ८०८ रुपये क्विंटल भावाने हरभरा विकला गेला.

आज हरभऱ्याला क्विंटलला ४ हजार ८१३ रुपये असा भाव मिळाला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार गेल्यावर्षी इतके हरभऱ्याचे उत्पादन अपेक्षित असले, तरीही हवामानामुळे हा अंदाज कितपत योग्य ठरेल याची शंका असताना हरभऱ्याला मिळत नसलेल्या भावामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आळवला जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सोयाबीनचे उत्पादन गेल्यावर्षी अधिक मिळेल, असा केंद्रीय कृषी मंत्रालयाचा अंदाज आहे. सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ४ हजार ३०० रुपये असून त्यापेक्षा अधिक भावाने सोयाबीनची विक्री सुरू आहे.

लातूरमध्ये गेल्या आठवड्यात सोयाबीनला ५ हजार ४६ रुपये क्विंटल असा भाव मिळाला होता. आत ४ हजार ९६० रुपये क्विंटल भावाने सोयाबीनची विक्री झाली आहे. कापसाची किमान आधारभूत किंमत ६ हजार ८० रुपये असून राजकोटमध्ये त्यास ७ हजार ५५८ रुपये असा भाव मिळाला आहे.

तसेच तुरीची किमान आधारभूत किंमत ६ हजार ६०० रुपये क्विंटल असून लातूरमध्ये मागील आठवड्यात ९ हजार १६० रुपये क्विंटल या भावाने तूर विकली गेली.

आज ९ हजार ५७५ रुपये असा भाव निघाला. देशात कमी उत्पादनाचा अंदाज असल्याने तुरीच्या भावात वृद्धी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.