
बाई ग कंबरडं मोडलं या महागाईनं; जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला
जुने नाशिक : इंधन, गॅस सिलिंडरपासून (Petrol & LPG Cylinder Price Hike) ते डाळीपर्यंत सर्वच गोष्टींचे दर आकाशाला भिडले आहे. महागाईमुळे संसाराचा गाडा डगमगण्यास लागला आहे. जीवन जगणेदेखील असह्य झाले आहे. ‘बाई गं कंबरडे मोडले या महागाईने अशी म्हणण्याची वेळ महिला वर्गावर आली आहे. गेल्या वर्षभरापासून महागाईचा (Inflation) आलेख सतत वाढतच आहे. त्याचा काही महिन्यांपासून सतत होणारी इंधन वाढ तसेच घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ यामुळे महागाईचा भडका उडाला आहे.(prices of essential commodities raised due to inflation Nashik News)
इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च वाढला. त्याची भर काढण्यासाठी दैनंदिन संसारोपयोगी पदार्थ वस्तू अर्थात किराण्यात मोठी दरवाढ झाली आहे. याशिवाय १ हजार रुपये सिलिंडर घरपोच करणाऱ्या डिलिव्हरी बॉयचे पैसे वेगळे अशाप्रकारे सिलिंडरच्या किमतीने हजारी पार केली आहे. संसाराचा गाडा हाकणाऱ्याचे कंबरडे मोडले आहे. महिला वर्गांचे दैनंदिन बजेट कोलमडले आहे. इंधन दरवाढीमुळे प्रवासी वाहनचालकांची मोठी कुचंबणा होत आहे. एकीकडे दैनंदिन इंधन वाढ होत आहे. दुसरीकडे वाहनचालकांना दैनंदिन भाडेवाढ करणे शक्य नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. काळी- पिवळी टॅक्सी रिक्षाचालकांना बऱ्याच वेळेस प्रवासी मिळणेदेखील अवघड होत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. स्कूल बसचे दर वाढल्याने पालक, तसेच वर्दी वाल्यांना आर्थिक फटका बसला आहे.
हेही वाचा: खड्डा नव्हे डासांचा अड्डा; महाकाय खड्डा बुजविण्याची मागणी
"घरातील आर्थिक नियोजन महिलांच्या हातात असते. प्रत्येक गोष्टीत झालेली दरवाढीने महिनाभराचे आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडते आहे. त्यात लहान मुलांचा खर्च वेगळा. महागाईने सगळ्याच गोष्टीवर बंधन लागत चालले आहे." - स्वाती पाटील, गृहिणी
"आपल्या जीवनाला अनेक समस्यांनी घेरले आहे. येणारा प्रत्येक दिवस एक नवीन समस्या घेऊन उदयास येतो. आपल्याला त्या समस्यांचा थोड्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. पण काही समस्या आशा आहे. ज्या आपल्याला सोडून जाण्याचे नावच घेत नाहीत. महागाई त्यापैकी एक समस्या आहे, जी कायम आपले विक्राळ रूप धारण करत चालली आहे. सामान्यांना जीवन जगणे असह्य झाले आहे." - पूजा खरे, गृहिणी
हेही वाचा: नाशिक : स्त्रीधन वगळता सर्वच मालमत्तांवर येणार टाच
"दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या दरांसह अन्य विविध प्रकारच्या वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहे. दैनंदिन गरजा पूर्ण करत खर्चाचा ताळमेळ घालणे. महिलांना अवघड झाले आहे. सर्वसामान्यांचे होणारी कुचंबणा बघता सरकारने त्यांचा अंत पाहू नये. महागाईवर उपाय योजना करावी." - दीपाली गांगुर्डे
"गेल्या काही महिन्यांपासून इंधन दर वाढ प्रवासी वाहनांचा व्यवसाय करणाऱ्या रिक्षा, काळी- पिवळी टॅक्सी चालकांवर अन्याय करणारी आहे. प्रवासी भाडेवाढ केल्यास प्रवासी मिळत नाही. उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारने इंधन दरवाढ आटोक्यात आणावी."
- बाळासाहेब पाठक, जिल्हाध्यक्ष, श्रमिक सेना
Web Title: Prices Of Essential Commodities Raised Due To Inflation Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..