
Holi Festival : पाथर्डी गावात वीरांची मिरवणूक
इंदिरानगर (जि. नाशिक) : पाथर्डी गावात वीरांची मिरवणूक उत्साहात पार पडली. मंगळवारी (ता.७) दुपारी ज्यांच्या घराच्या देव्हाऱ्यात पूर्वजांपैकी कुणाला देव पण घेऊन त्यांच्या घडवलेल्या मूर्ती आहेत त्या मूर्ती खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवण्यात आल्या.
घरातील बालकाला पारंपरिक वीराप्रमाणे सजवून या वीराच्या हातात ही खोबऱ्याची वाटी रुमालात घालून देण्यात आली. ग्रामस्थांच्या उपस्थितीत वाद्यांच्या तालावर गोल रिंगण करून नाचत, वाजत वीरांची मिरवणूक सुरू झाली. (Procession of heroes in Pathardi village Nashik News)
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
प्रत्येक घरासमोर सडे आणि रांगोळ्या काढून या वीरांचे स्वागत करण्यात आले. परंपरेनुसार मिरवणूक मारुती मंदिर प्रांगणात नेण्यात आली. या ठिकाणी परंपरेनुसार श्रीरामाची दोन गीते गाण्यात आली. त्यानंतर आपापल्या घरातील वीरांना घेऊन ग्रामस्थ घरी गेले.
घरी गेल्यानंतर या वीरांनी स्वच्छ हात पाय धूत घरात प्रवेश केला. गृहिणींनी त्यांची पूजा केली. सोबत नेलेल्या खोबऱ्याच्या वाटीची तळी भरण्यात आली आणि तो प्रसाद सर्वांना वाटण्यात आला. मनोभावे देव्हाऱ्यातून काढलेले वीर रुपी पूर्वज पुन्हा देव्हाऱ्यात ठेवण्यात आले.
याप्रसंगी सुनील कोथमिरे, मदन डेमसे, बाळकृष्ण शिरसाट, तानाजी गवळी, निवृत्ती गवळी, त्र्यंबक कोंबडे, खंडेराव धोंगडे, विजय गवळी, जगदीश डेमसे, जगदीश बोडके आदी उपस्थित होते.