
Tomato Price Fall: टोमॅटोचे भाव घसरल्याने उत्पादक चिंतेत; उत्पादन खर्च निघत नसल्याने तोडणी बंद!
Tomato Price Fall : टोमॅटोचे भाव अचानक गडगडल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभं राहिलं आहे. कमी भाव मिळाल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची तोडणी बंद केल्याने शेतातच टोमॅटो पिकून गेलेले आहे. (Producers worried due to fall in tomato prices nashik news)
उन्हाळी हंगामातील टोमॅटो पिकास चांगला भाव असतो या अपेक्षेने केरसाने (ता.बागलाण) येथील शेतकरी उत्तम अहिरे यांनी आपल्या शेतातील एक एकरात हे पिक घेतले. गतवर्षी या पिकात चांगले उत्पादन मिळाले होते.
या उद्देशाने त्यांनी लागवड करून पिकाची निगा राखली. यासाठी त्यांनी भाव मिळेल या अपेक्षेने चांगल्या प्रतीचा माल पिकविला. पहिलीच तोडणी करून मार्केट यार्डमध्ये चांगल्या भावाने विक्री झाली. दुसऱ्या तोडणीला भाव घसरल्याने केरसाणेसह बागलाण तालुक्यातील टोमॅटो उत्पादक हैराण झाले आहेत.
बिजोटे (ता. बागलाण) येथील शेतकरी सुपडू ह्याळीज यांनी वीस गुंठ्यांतील टोमॅटो रोप भाव नसल्याने उपटून फेकले आहेत. त्यातच श्री. अहिरे यांनाही हाच अनुभव आला. पहिल्या तोडीनंतर दुसऱ्या दिवशी टोमॅटोचे भाव गडगडले आणि केलेला खर्च वसूल होईना या उद्देशाने त्यांनी टोमॅटो तोडणी बंद केल्याने माल शेतातच लाल झाला आहे.
७० हजार रुपये खर्च करून पदरी फक्त १० हजार रुपये मिळाले. त्यांनी आपल्या जवळील असलेले सर्व भांडवल टोमॅटो पिकास टाकल्याने काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामातील मका बाजरी पेरणीसाठी येणारा बियाणे खर्च कोठून करावा या काळजीत ते आहेत.
श्री. अहिरे यांनी आपला द्राक्ष बाग तोडून त्याच लोखंडी ॲंगलवर तारांवर हे पीक सुतळीच्या आधारावर घेतले, मल्चिंग पेपरवर इनलाइनद्वारे हे पिक घेऊन निगा राखली. समाधानकारक भाव मिळून परिस्थिती सुधारेल अशी आशा असतानाच टोमॅटोने निराशा केली. आता तोडीअभावी शेतातच टोमॅटोचा चिखल होऊ लागला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
एक एकरात टोमॅटो पिकास खर्च (रुपयांमध्ये)
रोप १० हजार रुपये
लागवड खर्च ५ हजार रुपये
मल्चिंग पेपरसह इनलाइन खर्च १० हजार रुपये
सुतळी,दोन वेळा बांधणी ५ हजार रुपये
मजुरी १० हजार रुपये
रासायनिक खते व शेण खत १० हजार रुपये
औषध फवारणी लिकव्हिट खर्च २० हजार रुपये
"गतवर्षी टोमॅटो पिकास चांगला भाव मिळाला. या अपेक्षेने यंदाही हे पीक घेण्याचे धाडस केले. एक एकरासाठी ७० हजार रुपये खर्च केले. परंतु भाव न मिळाल्याने भांडवल खर्च करून कर्जबाजारी झालो. एक एकरातून अवघे १० हजार रुपये आले. केलेला खर्च वसूल न झाल्याने आता कोणते पीक घ्यावे या काळजीत आहे." - उत्तम अहिरे, टोमॅटो उत्पादक, केरसाने