esakal | खरीपाला पावसामुळे दिलासा; रब्बीला मात्र जोरदारची प्रतिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

farming

खरीपाला पावसामुळे दिलासा; रब्बीला मात्र जोरदारची प्रतिक्षा

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : कसमादे व चांदवड, नांदगाव परिसरात या हंगामात पावसाची अनियमितता होती. पिकांना ताण पडण्याच्या वेळेस टप्प्याटप्प्याने पाऊस झाल्याने खरीप हंगामाला दिलासा मिळतानाच पिकांना जीवदान मिळाले. आगामी रब्बी हंगाम व परिसरातील धरणे, लघुप्रकल्प, पाझर तलाव, गावतळी, विहिरी यासह जलसाठा वाढण्यासाठी अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.

अद्यापही ३७ टक्के जलसाठा होण्याची आवश्‍यकता

मालेगाव विभागात सर्वाधिक सरासरी पर्जन्यमान असलेल्या कळवण तालुक्यात २ सप्टेंबरअखेर अवघा ५८.३२ टक्के पाऊस झाला आहे. याउलट आवर्षणप्रवण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदगाव तालुक्यात सर्वाधिक ९४ टक्के तर मालेगाव तालुक्यात ९३ टक्के पाऊस झाला आहे. सरासरीच्या आसपास पाऊस असला तरी प्रत्यक्षात पावसाचे दिवस कमी होते. हरणबारी धरण वगळता गिरणा खोरे धरण समुहातील कोणतेही धरण अद्याप भरलेले नाही. चणकापूर धरणात ८६ टक्के साठा आहे. गिरणा धरणात ४७ टक्के तर नाग्यासाक्या धरणात ५७ टक्के साठा आहे. केळझर ९० टक्के भरले आहे. माणिकपुंज व हरणबारी धरण शंभर टक्के भरले असून, पुनंद धरणात ९१ टक्के साठा आहे. गिरणा खोऱ्यातील उपयुक्त जलसाठ्याची क्षमता २४ हजार ७०३ दशलक्ष घनफूट आहे. आजवरचा उपयुक्त पाणीसाठा १४ हजार १८८ दशलक्ष घनफूट असून, ६३ टक्के जलसाठा झाला आहे. अद्यापही ३७ टक्के जलसाठा होण्याची आवश्‍यकता आहे.

हेही वाचा: २७ हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकासह दोघांना अटक

सर्वात कमी पावसाची टक्केवारी चांदवड तालुक्यात

चांदवड तालुक्यात कामाची स्थिती बिकट आहे. ५२९ मिलीमीटर सरासरी पर्जन्यमान असलेल्या या तालुक्यात सर्वात कमी १९२ मिलीमीटर म्हणजे अवघा ३६ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची टक्केवारी चांदवड तालुक्यातच आहे. ऑगस्ट महिन्यात दोन आठवड्याच्या अंतराने दोनवेळा झालेल्या मुसळधार पावसाने कसमादेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाची टक्केवारी कमी आहे. सन २०२० मध्ये सप्टेंबरच्या प्रारंभी या सहाही तालुक्यात सरासरीच्या नजीक पाऊस होता. मालेगाव, नांदगाव, देवळा, बागलाण या चार तालुक्यांनी तर पावसाची सरासरी देखील ओलांडली होती. गेल्यावर्षी २ सप्टेंबरअखेर चांदवड तालुक्यात ४२३ मिलीमीटर पाऊस झाला होता. कळवण तालुक्यात ४९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत या हंगामात या दोन्ही तालुक्यात पावसाने ताण दिला आहे.

farm

farm

हेही वाचा: ग्रीन कॉरिडोअरने पोचविले यकृत; दोघांना मिळाली जगण्याची उमेद

एकूण पाऊस मिमीमध्ये (कंसात टक्केवारी)

कळवण - ३७३ मिमी (५८.३२ टक्के)
बागलाण - ३५१ (७२.०६)
मालेगाव - ४२९ (९३.७५)
देवळा - ३५२ (८३.२७)
चांदवड - १९२ (३६.३६)
नांदगाव - ४६३ (९४.२३)

loading image
go to top