Nashik : ‘मृगा’च्या पूर्वसंध्येला उन्हाचा चटका

ladies under umbrella
ladies under umbrella esakal

नाशिक : अंदमानात वेळेपूर्वीच पोचलेला मॉन्सून (Monsoon) आणि मेअखेरपर्यंत संपूर्ण देश व्यापू पाहणारा त्याचा वेग यासारख्या घडामोडींवर आधारित सारेच अंदाज साफ धुडकावून लावत, मॉन्सूनने सर्वांनाच चकमा दिला आहे. प्रत्यक्षात मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला सोमवारी (ता. ६) कमाल तापमान (Maximum Temperature) सरासरी ३६ अंशांच्या आसपास नोंदले गेले असले, तरी उन्हाचा चटका मात्र जीवघेणा ठरत आहे. (raising temperature in city during pre monsoon Nashik News)

दरम्यानच्या काळात राज्यातील अनेक भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तापमानात काहीशी घट दिसून आली होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून या मान्सूनपूर्व पावसानेही उघडीप दिली असून, राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट वाढल्याचे चित्र आहे. विशेषत: राज्यात चंद्रपूर येथे तर देशातील उच्चांकी ४६. ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ विदर्भातील गोंदिया, ब्रह्मपुरी, वर्धा, नागपूर येथेही तापमान ४५ अंशांच्या आसपास होते. असे असतानाही हवामान विभागाने विदर्भात उष्ण लाटेचा इशारा दिला असल्याने, उर्वरित महाराष्ट्रालाही या उष्णतेची तीव्रता लक्षात येते.

या परिस्थितीसाठी पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यापासून नागालॅन्ड पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पूर्व-पश्‍चिम सक्रिय असणे कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, पश्‍चिम बंगालपासून आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्याचवेळी बिहार ते आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्याचाच परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा चटका कायम आहे.

दैनंदिन व्यवहारांवर विपरीत परिणाम

कमालीची उष्णता ही पावसाच्या आगमनाची सूचना मानली जात असली आणि मंगळवार (ता. ७) ही मृग नक्षत्राच्या आगमनाची तारीख असली, तरी प्रत्यक्षात शनिवार- रविवारपाठोपाठ सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारीही दिवसभर शहरात तप्त उन्हामुळे जिवाची काहिली म्हणजे काय असते, याचाच अनुभव शहरवासीयांनी घेतला. विशेषत: पावसाळ्याची आस लागलेल्या नाशिककरांना भर दुपारी रस्त्यांवरील शुकशुकाट, उन्हाच्या तडाख्यापासून बचावासाठी करावी लागणारी कसरत, घराघरांत अन्‌ प्रत्येक कार्यालयात सुरू असलेली एसी, कुलर, पंखे यासारखी उपकरणे, प्रत्येकाच्या तोंडी उष्म्याचीच चर्चा हा अनुभव मात्र अनाकलनीय ठरत होता. अत्र-तत्र-सर्वत्र उन्हाच्या काहिलीचीच चर्चा होती. त्यामुळे दैनंदिन व्यवहारांवरदेखील त्याचा विपरीत परिणाम बघावयास मिळाला.

ladies under umbrella
कळवणला साकारतोय अत्याधुनिक जॉगिंग ट्रॅक; 22 कोटी रुपये मंजूर

येरे येरे पावसा

साधारणत: जूनच्या सुरवातीला ढगाळ वातावरण, सोसाट्याचे वारे, हवेची बदलत चाललेली दिशा आणि शेतीउपयोगी साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमधील लगबग असे सर्वसाधारण वातावरण असते. त्यावरूनच पावसाळ्याची चाहूल लागत असते. अशा काळात कमालीचा उकाडा सहन करावा लागला, तरी पावसाच्या आगमनाची चाहूल त्याची तीव्रता कमी करण्यास पुरेशी असते. यंदा मात्र जूनमध्ये अनुभवावयास मिळत असलेले तप्त ऊन चिंतेत पाडणारे दिसत आहे. पावसाळ्याच्या आगमनाची कुठलीही चाहूल नसल्याने नागरिकांवर ‘येरे येरे पावसा’ म्हणण्याची वेळ आल्याचे शहरात सर्वच ठिकाणी बघावयास मिळत आहे.

ladies under umbrella
होतकरु नाट्यकलावंत प्रतीक गुंजाळचे निधन

"पक्षी नष्ट झाले तर भविष्यात माणसासाठी धोका निर्माण होणार, हे कायम लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे अन्नसाखळीचा आदर ठेवून या अन्नसाखळीचा घटक म्हणूनच वावरणे गरजेचे आहे. नैसर्गिक विनाशासाठी माणूस कारणीभूत असल्याने आता त्याच्या संवर्धनासाठीही माणसानेच पुढाकार घेऊन एकत्रित प्रयत्न करायला हवेत. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांचे खूपच हाल झाले. त्यातच पावसाला उशीर होत असल्याने आणखीच हाल होत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची सोय कुठे करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे."

- दत्ता सानप, सामाजिक कार्यकर्ता, मेरी- म्हसरूळ-दिंडोरी रोड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com