
Nashik BJP News : भाजपमध्ये भाकरी फिरली! नाशिकची सूत्रे गिरीश महाजनांकडून राजेंद्रकुमार गावितांकडे
Nashik News : माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पुन्हा एकदा भाजपच्या संघटनेची सूत्रे येत असताना अचानक त्यांच्याकडून प्रभारीपद काढून घेत भाजपचे नंदुरबारमधील ज्येष्ठ नेते राजेंद्रकुमार गावित (Rajendrakumar Gavit) यांच्याकडे सोपविण्यात आल्याने नाशिक भाजपमध्ये (BJP) मोठा धक्का मानला जात आहे. (Rajendra Kumar Gavit has been in charge of BJP organization from Girish Mahajan nashik news)
त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राची संघटनात्मक जबाबदारी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच घोषणा केली. श्री. गावित आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू आहेत. त्यांची नंदुरबारमध्ये शिक्षणसंस्था असून क्रीडा, साहित्य क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे.
मितभाषी, पारदर्शक प्रतिमा आणि त्यांनी पक्षात केलेल्या पक्षाच्या निःस्वार्थ सेवेमुळे त्यांच्यावर नाशिकची जबाबदारी देत भाजपने एक नवा संदेश दिल्याचे मानले जात आहे. भाजप अधिकाधिक बहुजन चेहऱ्यांना संधी देत संघटना मजूबत करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे यातून दिसून येते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मंत्री गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यांच्या कार्यकाळात नाशिक महापालिकेत सत्ता येण्याबरोबरच संघटनात्मक पातळीवर पक्ष भक्कम करण्याची जबाबदारी त्यांनी प्रामुख्याने पार पाडली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही महाजन यांनी नाशिकवर कंट्रोल कायम ठेवला.
राज्यात फडणवीस व शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर महाजन यांना मात्र नाशिकच्या पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आले. संघटनेचे प्रभारीपद मात्र कायम ठेवण्यात आले. त्यामुळे गिरीश महाजन कुठल्याही क्षणी नाशिकमध्ये येऊ शकतात, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये होती.
श्री. महाजन यांचा वाढदिवस असो किंवा गुजरात व कर्नाटकाच्या निवडणुका. महाजन जेथे असतील तेथे नाशिकहून पदाधिकारी जात होते. मात्र आता महाजन यांच्याकडे प्रभारीपदाची देखील जबाबदारी ठेवण्यात आलेली नाही.
भाजपचे नंदुरबारमधील आदिवासी नेते राजेंद्र गावित यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील पक्ष संघटनेची जबाबदारी सरचिटणीस विजय चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
महाजन समर्थकांना धक्का
यापूर्वी महाजन यांच्याऐवजी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे संपर्कमंत्री पद सोपविण्यात आले, तर महाजन यांच्याकडे बीड व संभाजीनगरची जबाबदारी देण्यात आली. एकूणच महाजन यांना नाशिकपासून दूर ठेवल्याने पक्षांतर्गत असलेल्या महाजन समर्थकांना मोठा धक्का मानला जात आहे.
"भाजपने नाशिक जिल्ह्याची जबाबदारी टाकून माझ्यावर मोठा विश्वास व्यक्त केला आहे. नाशिकमध्ये भाजपचे संघटन मोठे आहे. ते अधिक व्यापक करण्यासाठी मी प्रयत्न करेन. नाशिकमधील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात समन्वय साधून पक्षाला आगामी सर्व निवडणुकांत सर्वाधिक यश प्राप्त करण्यासाठी मी प्रयत्न करेन." - राजेंद्रकुमार गावित, ज्येष्ठ भाजप नेते, नंदुरबार