Ramadan Festival : मालेगावच्या बाजारपेठांना रमजानचे वेध!व्यापाऱ्यांकडून मालाची खरेदी; दुकाने सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A crowd gathered to buy shoes and clothes on Kidwai Street

Ramadan Festival : मालेगावच्या बाजारपेठांना रमजानचे वेध!व्यापाऱ्यांकडून मालाची खरेदी; दुकाने सज्ज

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात मुस्लीम बांधवांचे रमजान पर्व लवकरच सुरु होणार आहे. या पाश्‍र्वभूमीवर बाजारपेठांना रमजानचे वेध लागले आहे. विक्रेत्यांनी मालाची खरेदी करण्यास सुरवात केली आहे. बाजारपेठा व दुकाने हळूहळू सज्ज होवू लागली आहेत.

घाऊक व्यापाऱ्यांनी खजूर, कपडे, चप्पल, बूट, सौंदर्य प्रसाधने आदी साहित्य दुकानात साठवून ठेवण्यास सुरवात केली आहे. रमजान पर्वात शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी उत्तर महाराष्ट्रातील ग्राहक पसंती देतात. (Ramadan Festival markets of Malegaon filled with Ramadan Buying goods from traders Shop ready nashik news)

शहरात दिवाळी व रमजान पर्वात सर्वाधिक उलाढाल होते. यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात रमजान पर्वाला सुरवात होणार आहे. या काळात महिनाभर ईदच्या खरेदीची धूम असते.

येथील किदवाई रोड, मोहम्मद अली रोड, अंजुमन चौक, गांधी मार्केट आदी खरेदीचे प्रमुख केंद्र आहेत. या भागात कपड्यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर असून व्यावसायिकांनी दुकाने सजविण्यास सुरवात केली आहे.

येथील बाजारपेठेत रमजान पर्वात जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, नगर आदी जिल्ह्यातील नागरिक शहरात कपडे खरेदीसाठी येत आहेत. यावर्षी कपड्यांच्या बाजारपेठेत शबे-ए-बारात पासूनच उसळी घेतली आहे. रमजान पर्व सुरु होण्याआधीच काहींनी खरेदीला सुरवात केली आहे.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

आगामी काळात येथील बाजारपेठा गजबजून जाणार आहेत. यावर्षी कपडे, चप्पल, सौंदर्य प्रसाधने यांच्या किंमती वाढल्या आहेत. बुधवारी (ता.२२) किंवा गुरुवारी (ता. २३) चंद्रदर्शन झाल्यानंतर उपवासाला (रोजाला) सुरवात होणार आहे. रमजान पर्वामुळे फळबाजार, खजूर व इतर फळांची आवक वाढू लागली आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेने यंत्रमागाचा खडखडाट वाढल्याने यावर्षी नागरिकांमध्ये रमजान पर्वाबाबत उत्साहाचे वातावरण आहे.

सरदार चौक, मोहम्मद अली रोड, भिक्कू चौक, इकबाल डाबी, देवीचा मळा आदी भागांमध्ये फळांची दुकाने लावण्यासाठी हातगाड्या लावून जागा आरक्षित केली जात आहे. फळ व खजूर व्यावसायिकांनी दुकानात मोठ्या प्रमाणात खजूर भरून ठेवला आहे. येथे पहिल्या रोजाला खजूरची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते.