Rangpanchami Festival : रंगोत्सवासाठी बच्चेकंपनीत ‘कलर गन’ ची क्रेझ! पिचकाऱ्यांच्या किमतीत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A little girl who was shocked to see the new type of sprayer that was sold in the market.

Rangpanchami Festival : रंगोत्सवासाठी बच्चेकंपनीत ‘कलर गन’ ची क्रेझ! पिचकाऱ्यांच्या किमतीत वाढ

नाशिक : होळीनंतर आता बच्चेकंपनीला रंगपंचमीचे वेध लागले आहे. त्यासाठी बाजारात विविध आकारातील पिचकाऱ्या दाखल झाल्या आहेत, तरीही यंदा बच्चेकंपनीत ‘कलर गन’ ची क्रेझ कायम असल्याचे दिसून येते.

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने यंदा सर्वच प्रकारच्या रंगांसह पिचकाऱ्यांच्या किमतीत पंधरा ते वीस टक्के वाढ झाली आहे. (Rangpanchami Festival Colour Gun craze in children for Rangotsava Increase in price of sprinklers nashik news)

काही वर्षांपूर्वी रंगपंचमीला एकमेकांच्या अंगावर छोटा डबा, बादलीने रंग टाकले जात असतं. परंतु त्यानंतर बच्चेकंपनीसाठी वेगवेगळ्या आकारातील पिचकाऱ्यांचा पर्याय उपलब्ध झाला. सध्या चायनासह देशाच्या विविध भागातून प्लॅस्टिकपासून बनविलेल्या विविध आकारातील गन उपलब्ध झाल्या असून त्याची बच्चेकंपनीत मोठी क्रेझ आहे.

साधारण तीस रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय छोट्या डब्यांपासून वजनावर विविध रंगही उपलब्ध आहेत. त्यातील २ इन वन रंगांच्या डब्यांना तरुणाईची पसंती आहे. पाठीवर रंगाची छोटी पसरट बँग अडकवून पाइपद्वारे रंगाची उधळण करणाऱ्या बॅगलाही मागणी आहे. त्या दीडशे रुपयांपासून बाराशे रूपयांत उपलब्ध आहेत.

हर्बल कलरला मागणी

बाजारात विविध आकारातील डब्यांमध्ये रंग विक्रीस ठेवण्यात आले आहे. याशिवाय प्लॅस्टिकच्या पिशवीतील रंगांनाही पसंती मिळत आहे. यात हर्बल, पावडर, कलर बॉम्ब आदी प्रकारांनाही मागणी असल्याचे विक्रेते सांगतात.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

तरीही तरुणाईची पसंती हर्बलला अधिक असल्याचे सीझन गिफ्ट ॲन्ड नॉव्हेल्टीजचे संचालक सागर राठी यांनी सांगितले. कोरोनानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर मागणीत वाढ झाली, परंतु त्याप्रमाणात पुरवठा नसल्याने सर्वच प्रकारच्या पिचकाऱ्या, रंगाच्या दरात दहा ते वीस टक्के वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

रंगपंचमीच्या दिवशी फुग्यांमध्ये रंगीत पाणी भरून ते एकमेकांच्या अंगावर फेकले जातात. त्यासाठी विविध आकारातील रंगाच्या डब्यांसह फुगे विक्रीस चांगला प्रतिसाद आहे. त्यात लहान आकाराचे पंचवीस फुगे अवघे दहा रूपयांत उपलब्ध आहेत. याशिवाय पाचशे फुग्यांचे पाकीट ऐंशी ते शंभर रूपयांत उपलब्ध आहे.

"मुलांमध्ये कलर गनची क्रेझ अद्यापही टिकून आहे. मात्र मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने यंदा रंगांसह सगळ्याच प्रकारच्या पिचकाऱ्यांच्या किमतीत वाढ झाली आहे."

- सागर राठी, संचालक, सीझन गिफ्ट ॲन्ड नॉव्हेल्टीज

"गेल्या तीस वर्षापासून रंगपंचमीला रंगविक्रीचा व्यवसाय करतो. या वर्षी रंगाच्या किमतीत वाढ झाली आहे, तरीही ग्राहकांची पसंती अद्यापही सुट्या रंगांना अधिक आहे."- विष्णू बर्वे, विक्रेता.