
Rangpanchami Festival : पेशवेकालीन रहाड रंगोत्सव संस्कृती आजही टिकून; रहाड खोदण्याच्या कामास वेग
जुने नाशिक : शहरातील पेशवेकालीन रहाड रंगोत्सव संस्कृती आजही टिकून आहे. रंगप्रेमींना रहाडीचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. शहरासह जिल्ह्यातील रंगप्रेमी रहाडीमध्ये डुबकी मारण्याचा आनंद घेण्यासाठी शहरात येत असतात.
त्यानिमित्ताने पंचवटी, जुने नाशिक परिसरातील रहाड खोदण्याच्या कामास वेग आला आहे. (Rangpanchami Festival Peshwa era Rahad Rangotsav culture survives today Speed up excavation work nashik news)
पेशवेकाळात रहाड रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत. जुने नाशिक, पंचवटी भागात पेशव्यांनी ठिकठिकाणी रहाडी तयार करून ठेवल्या आहेत. कालांतराने प्रत्येक रहाडीचा मान वेगवेगळ्या कुटुंबीयांना देण्यात आला.
ही परंपरा मान दिलेल्या त्या कुटुंबीयांनी आजही कायम ठेवली आहे. रहाड उत्सवाला सुमारे साडेतीनशे ते चारशे वर्षाची परंपरा आहे. कोरोना आणि पाणी टंचाईचे संकट आल्याने या दोन वर्षाच्या काळात रहाड रंगोत्सवास खंड पडला होता.
यंदा विशेषतः तरुण वर्गात मोठा उत्साह दिसून येत आहे. सर्वत्र रहाड उघडण्याचे काम सुरू झाले आहे. रहाडीत रंग खेळण्यासाठी येणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या अधिक असते. जुनी तांबट लेन येथील रहडीत रंग खेळण्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी दरवर्षी दोन तासाची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
त्या वेळेत केवळ महिला रहाड रंगोत्सवाचा आनंद घेत असतात. इतर रहाडींजवळ महिलांसाठी रंग खेळण्यासाठी वेगळी व्यवस्था करून दिली जाते. रहाडीत एका वेळेस शंभर ते सव्वाशे व्यक्ती रंग खेळत असतात. असे दिवसभरात तीन ते चार हजारपेक्षा अधिक नागरिक रहाड रंगोत्सवाचा आनंद घेत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
सर्वाधिक रहाडी जुने नाशिकमध्ये
शहरात पूर्वी १६ रहाडी होत्या. सध्या त्यातील केवळ पाच रहाडी उघडल्या जातात. सर्वाधिक रहाडी जुने नाशिकमध्ये आहे. जुने नाशिक येथे तीवंदा चौक, जुनी तांबट गल्ली, दिल्ली दरवाजा, काझीपुरा दंडे हनुमान मंदिर समोर तसेच पंचवटी शनी चौक अशा पाच रहाडी उघडत असतात, तर सुंदरनारायण मंदिर परिसर, सरदार चौक, राममंदिर, मधली होळी, रोकडोबा तालीम, भद्रकाली भाजी मार्केट, फुले मार्केट, कठडा शिवाजी चौक, डिंगरअळी चौक या भागातील रहाडी अनेक वर्षापासून बंद आहे.
रंग ठरलेले
प्रत्येक रहाडीचे रंग ठरलेले आहेत. दिल्ली दरवाजा येथील रहाडीत केसरी, तिवंदा पिवळा, जुनी तांबट गल्ली केसरी, शनी चौक गुलाबी, काझीपुरा केसरी असे रंग आहेत. काझीपुरा आणि दिल्ली दरवाजा येथील रहाडींमध्ये फुलांपासून तयार केलेला नैसर्गिक रंगाचा वापर केला जातो. इतरांमध्ये बाजारातील रंग वापरतात.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
असे आहेत मानकरी
दिल्ली दरवाजा रहाडीचे बेळे कुटुंबीय
पंचवटी शनी चौक दीक्षित कुटुंबीय
तिवंदा औरंगाबादकर कुटुंबीय
जुनी तांबट गल्ली मेहता कुटुंबीय
काझीपुरा कलाल कुटुंबीय
"रहाड रंगोत्सवाची पेशवेकालीन परंपरा आहे. सर्वप्रथम मानकरी कुटुंबीयांचे सदस्य रहाडीत डुबकी घेतात. आधुनिक युगातही अजूनही रहाड रंगोत्सवाची संस्कृती टिकून आहे. याचे समाधान वाटते." - सोमनाथ बेळे, दिल्ली दरवाजा रहाडीचे मानकरी