esakal | नामपूरला 2 दिवसांत कांद्याची विक्रमी आवक; मिळाला सर्वोच्च सरासरी भाव
sakal

बोलून बातमी शोधा

onion

नामपूरला कांद्याची विक्रमी आवक; मिळाला सर्वोच्च सरासरी भाव

sakal_logo
By
प्रशांत बैरागी

नामपूर (जि.नाशिक) : येथील बाजार समिती व करंजाड उपबाजार आवारात गेल्या दोन दिवसांत दोन हजार ६०० वाहनांमधून सुमारे ४५ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक झाली. उन्हाळ कांद्याला एक हजार ५७५ रुपये प्रतिक्विंटल असा सर्वोच्च एक हजार ४०० रुपये असा सरासरी भाव मिळाला. आज (ता. १५) सकाळ सत्रात लिलाव होणार नसून दुपारी दोनला कांद्याचे लिलाव सुरू होतील, अशी माहिती बाजार समितीचे सभापती शांताराम निकम, उपसभापती लक्ष्मण पवार, सचिव संतोष गायकवाड यांनी दिली.

नामपूरला दोन दिवसांत कांद्याची विक्रमी आवक

मोसम खोऱ्यात यंदा विक्रमी कांदा शेतकऱ्यांकडे आहे. परंतु रोगट हवामानामुळे कांद्याचे आयुष्य कमी झाल्याने चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होऊ लागला आहे. सप्टेंबर महिना उजाडला तरी कांद्याच्या दरात अपेक्षित वाढ होत नसल्याने शेतकरी दैनंदिन कांदा विक्रीचे नियोजन करत आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस सुट्या आल्याने सोमवार (ता. १३)पासून उन्हाळ कांद्याची बाजारात विक्रमी आवक होत आहे. कांद्याने भरलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे सटाणा रस्त्यालगत वाहतूक विस्कळित झाली होती. मंगळवारी (ता. १४) पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी समाधानी होते. साक्री तालुक्यातूनही येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. सकाळी (ता.१४) नऊपासून लिलावाला सुरवात झाली. कोरोनाचे सर्व नियम पाळून नामपूरला दोन दिवसांत एक हजार ९०० वाहने, तर करंजाडला सातशे वाहनांचे लिलाव करण्यात आले. जिल्हा उपनिबंधक, सटाणा येथील सहाय्यक निबंधक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे कोरोनाकाळात बाजार समितीचे लिलाव कामकाज नियमित सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी मालाची प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, लिलाव झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांकडून रोख पेमेंट घ्यावे, कोरोनाकाळात गर्दी टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सचिव संतोष गायकवाड, अरुण अहिरे यांनी केले आहे.

हेही वाचा: नाशिक पोलिसांसमोर नारायण राणे होणार हजर!

हेही वाचा: लखमापूर : विवाहितेची आत्महत्या; हुंड्याच्या रक्कमेसाठी छळ

loading image
go to top