Nashik Crime News: बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याला 16 लाखांना गंडा | Retired bank employee extorted 16 lakhs Nashik Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nashik Crime News: बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याला 16 लाखांना गंडा

Nashik Crime News : निवृत्त बँक कर्मचाऱ्यास पोर्टलवरून आरोग्य सेवेचे अपडेशन करून देण्याचे सांगत त्याचा मोबाईल हॅक करत सायबर भामट्याने त्यांच्या बँक खात्यातून १६ लाख काढून घेत गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलिसांत अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. (Retired bank employee extorted 16 lakhs Nashik Crime News)

जितेंद्र जयशंकर धारिया (७८, रा. लोकसहकारनगर, दिंडोरी रोड, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, ते काही वर्षांपूर्वी स्टेट बँकेतून निवृत्त झाले. घरी असताना त्यांना १५ ते १७ मार्चदरम्यान एसबीआय बँकेच्या एचआरएमएस पोर्टलवरून आरोग्य सेवा-सुविधांबाबात माहिती घ्यायची होती.

त्यासाठी ऑनलाइन हेल्पलाइनची मदत घेतली असता, त्यांची १६ लाखांची फसवणूक झाली. धारिया यांनी ज्या हेल्पलाइनची मदत घेतली तीच बनावट होती. त्या हेल्पलाइन संबंधित वेबसाईटवरील संशयित सायबर भामट्याने त्यांना एसबीआय बँकेच्या माजी नोकरदारांना मेडिकल सुविधा मिळण्याकरिता एसबीआयच्या एचआरएमएस या पोर्टलवर नाव नोंदविण्यास सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विश्वास ठेवत धारिया यांनी आवश्यक ती सर्व माहिती सायबर भामट्याला शेअर केली. त्याने ऐनी डेस्क हे अॅप त्यांना मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी केले आणि त्यांच्या मोबाईलचा ताबा घेत भामट्याने त्यांच्या बँकेच्या योनो अॅपचा अॅक्सेस मिळवत यूझर आयडी व पासवर्ड घेऊन बँक खात्यातून १६ लाख ६६ हजार रुपये काढून घेत गंडा घातला.

बँक खात्यातून पैसे डेबिट झाल्याचे मेसेज येताच त्यांना धक्का बसला. या प्रकाराने ते घाबरल्याने त्यांनी उशिराने तक्रार दिली. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :crime news in marathi