Summer Heat: वाढत्या तापमानाचा दूधाला फटका! उत्पादनात मोठी घट, बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन | Rising temperature affects on milk business Big drop in production call for care for rescue nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milk Production

Summer Heat: वाढत्या तापमानाचा दूधाला फटका! उत्पादनात मोठी घट, बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन

विकास गितेः सकाळ वृत्तसेवा

सिन्नर, ता.२७ : मागील काही आठवठे जिल्ह्यात उष्णतेचा कहर असून उष्माघाताने मानवासह, पशूपक्षी तसेच जनावरांवर परिणाम झालेला आढळून आला. अशातच तालुक्यासह जिल्ह्यात तापमानात वाढ होत असल्याने त्याचा परिणाम दुभत्या जनावरांवर झाला असून हिरवा चारा, पशूखाद्य असूनही दूधामध्ये घट झालेली आहे.

या फटका शेतकऱ्यांना बसत असून उन्हापासून दुभत्या जनावरांना सांभाळा अस् सल्ला पशूवैद्यक देत आहे. सध्या तालुक्यातील तापमान कधी ३८ अंशासह तर कधी ४१ अंशापर्यंत जात आहे, त्यामुळे दूधउत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. (Rising temperature affects on milk business Big drop in production call for care for rescue nashik news)

वाढलेल्या तापमानाचा फटका माणसाप्रमाणेच जनावरांनाही बसत आहे. गावोगावी असलेल्या दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनात मोठी घट होत आहे. शारीरिक तापमान एक अंश सेल्सिअसने वाढल्यास एक लिटरपर्यंत दूधात घट होऊ शकते.

दुधाची प्रत घसरते. दुधातील फॅट, एसएनएफ, साखर, प्रथिने इत्यादीची पातळी खालावते. थोड्याफार प्रमाणात दूध पातळ होते. सध्या येणारे दूध असेच असल्याने महिलाही विचारू लागल्या आहेत.

उन्हामुळे पशूंच्या आरोग्याचे अनेक समस्या उद्भवत आहेत. सर्वाधिक फटका दुभत्या जनावरांना बसत असून, दूध उत्पादनात मोठी घट दिसून येत आहे. यामुळे दुग्ध व्यावसायिकांचे नुकसान होत असून, त्यांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.

जनावरांच्या गोठ्याचे व आहाराचे व्यवस्थापन न केल्यास जनावरांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. दुभती जनावरे जास्त दूधनिर्मिती करत असल्यामुळे दूध निर्माण करताना शरीरात जास्तीची उष्णता निर्माण होते.

परिणामी, दुभती जनावरे उन्हामुळे आजारी पडतात. तालुक्यातील तीव्र उष्णतेच्या लाटेचा दुग्धव्यवसायावर परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या दुधाचा दर्जा खालावत आहे. दुसरीकडे पशुपालकांना वाढत्या उन्हामुळे दुध उत्पादनात घट सहन करावी लागत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशी घ्यावी जनावरांची काळजी

उन्हाळ्यात झाडाच्या सावलीत किंवा गोठ्यात जनावरांना बांधावे. स्वच्छ पाण्याने त्यांना अंघोळ घालावी. काही आरोग्याचे प्रश्न असल्यास तज्ज्ञ पशूवैद्यकांचा सल्ला घ्यावा. उन्हाळ्यात हिरवा चारा खाण्यास द्यावा.

मुबलक पाणी पिण्यास द्यावे. या दिवसात जनावरांना 'भूक कमी लागते, मात्र तहान जास्त लागते. यामुळे गुरांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी द्यावे. साधारण दिवसातून तीन वेळा पाणी पिण्यास द्यावे.

त्यामुळे जनावरांच्या शरीरातील तापमान नियंत्रित राहते. यासह आपण जर गुरांना पाण्यात मीठ आणि पीठ टाकून पिऊ घातल्यास ते फायदेशीर असते.

तापमानातील वाढीत काळजी घ्या

आठवड्यात तालुक्यासह जिल्ह्यातला तापमानाचा पारा सतत वाढत आहे. तालुक्यात आज काही ठिकाणी ४१ अंश तापमानाचीही नोंद झाली. वाढत्या उन्हापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी पशुपालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

शेतीला जोड व्यवसाय म्हणून जिल्ह्यातील शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. मात्र, सध्या वाढत्या तापमानापासून दुभत्या जनावरांची वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

"शेती व्यवसायाची आधुनिकतेकडे वाटचाल होत असताना जोडधंदा दुग्धव्यवसाय फायदेशीर ठरत आहे. मात्र, पशुखाद्य, हिरव्या चाऱ्याची उपलब्धता असूनही दुधाचे उत्पादन कमी झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. अनेक ठिकाणी संपूर्ण कुटूंब यात गुंतले आहे."

- योगेश शिंदे, दूध उत्पादक शेतकरी