esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Road construction

भर पावसात रस्ते डांबरीकरण; नागरिकांनी उघडकीस आणला प्रकार

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : पावसाळ्यात रस्त्यांची कामे बंद असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला तरी भर पावसात अनेक ठिकाणी रस्त्यांवर डांबराचे थर मारण्याचे प्रकार सुरू आहे. जागरूक नागरिकांनी प्रभाग २४ मध्ये रस्त्याचे काम सुरू असल्याचे माध्यम प्रतिनिधींना निदर्शनास आणून दिल्याने महापालिकेचा दावा फोल ठरला आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी पावसात सुरू असलेल्या कामांची दखल घेताना काम योग्य असेल तरच ठेकेदारांची बिले अदा करू, अशी भूमिका घेतली. रस्त्याचे काम सदोष आढळल्यास ठेकेदारांवर कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

पाऊस सुरू असताना डांबरीकरणाची कामे कशी..?

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने अडीचशे कोटी रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली. अनेक भागामधील नव्याने तयार झालेल्या नवनगरांमध्ये रस्ते नसल्याने, तसेच मीसिंग लिंक तयार करणे गरजेचे असल्याचे कारण देत, रस्ते कामाला मंजुरी दिली. एप्रिल व मे महिन्यात शहराच्या सर्व विभागांमध्ये रस्त्यांची कामे सुरू झाली. जून महिन्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर कामे बंद करणे अपेक्षित असताना भर पावसात रस्ते व रस्त्यांवर डांबरीकरणाची कामे सुरू असल्याने नागरिकांनी आक्षेप घेतला. पाऊस सुरू असताना डांबरीकरणाची कामे कशी होत आहे, असा सवाल उपस्थित केल्यानंतर बांधकाम विभाग खडबडून जागा झाला. २० टक्के रस्त्याची कामे झाले असल्याचा दावा करत दिवाळीनंतर उर्वरित कामे करण्याच्या सूचना दिल्याचे बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. पावसाळा संपण्यास अद्याप काही दिवस शिल्लक असताना अनेक भागांमध्ये रस्ते डांबरी करण्याचे कामे सुरू असल्याचे प्रकार प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांनी उघडकीस आणला. त्यामुळे पावसाळ्यात कामे बंद असल्याचा बांधकाम विभागाने केलेला दावा फोल ठरला आहे.

हेही वाचा: नगरचा असलेला शेजार तापदायक! येवला, निफाड, सिन्नरची चिंता वाढली

अधिकारी एक, विभाग दोन

शहर अभियंता नितीन वंजारी यांच्याकडे बांधकाम, गुणवत्ता व नियंत्रण हे दोन्ही विभाग आहे. बांधकाम विभागाने केलेल्या कामाची गुणवत्ता व नियंत्रण विभागाने तपासणी करून संबंधित ठेकेदाराला देयके देण्यासंदर्भात ना हरकत दाखला दिला जातो. मात्र, बांधकाम व गुणवत्ता नियंत्रण विभाग एकाच अधिकाऱ्याकडे असल्याने रस्त्यांची गुणवत्ता कशाच्या आधारे तपासणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

...तर ठेकेदारांची बिले अदा

भर पावसात सुरू असलेल्या कामांची महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दखल घेतली असून, शहरात नव्याने तयार झालेले रस्ते तसेच डांबरीकरणाचा आढावा घेतला जाणार आहे. रस्त्याचे कामे योग्य असेल तर ठेकेदारांची बिले अदा केली जातील. रस्त्यासंदर्भात नागरिकांकडून तक्रार आल्यास त्याची शहानिशा करून संबंधित ठेकेदारांवर व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

हेही वाचा: महापालिकेचा पुन्हा दंडात्मक कारवाईचा निर्णय

loading image
go to top