Nashik Crime : कारचालकास गुंगीचे औषध देऊन लुटणार्यास अटक; शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकची कामगिरी | Robber arrested looting giving drug to car driver Performance of Unit One of City Crime Branch Nashik Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arrested

Nashik Crime : कारचालकास गुंगीचे औषध देऊन लुटणार्यास अटक; शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकची कामगिरी

Nashik Crime : मुंबई येथून उबेर कारने नाशिकला आलेल्या संशयिताने उबेर चालकाला पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देत बेशुद्‌ध केले. त्यानंतर संशयिताने पैशांचे पाकिट आणि मोबाईल चोरून पोबारा केला होता.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने नाशिकरोड परिसरात संशयिताला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (Robber arrested looting giving drug to car driver Performance of Unit One of City Crime Branch Nashik Crime)

शुभम उर्फ स्वदेश दीपक नागपुरे (२५, ह.मु. जास्मीन सोसायटी, आसनगाव, रहाटी, जि. ठाणे. मूळ रा. साईदर्शन रो हाऊस, श्री रामचंद्रनगर, दिंडोरी रोड, म्हसरुळ, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. राहुल प्रसाद शिवनंदन प्रसाद (२४, ह.रा. तीन हात नाका, ठाणे. मूळ रा. झारखंड) यांच्या फिर्यादीनुसार, तो उबेर कंपनीसाठी प्रवासी स्वीफ्ट कार चालवितो.

गेल्या शनिवारी (ता. ६) संशयिताने मुंबईतून नाशिकला येण्यासाठी उबेर कार भाडेतत्त्वावर केली. प्रवासादरम्यान संशयिताने कारचालकास पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे चालकाला गुंगी आल्यानंतर संशयिताने त्याच्या खिशातील पैशांचे पाकिट व मोबाईल फोन चोरून पोबारा केला. याप्रकरणी भद्रकाली पोलीसात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून शहर गुन्हेशाखेला तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, युनिट एकचे विजय ढमाळ यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत समांतर तपास सुरू केला.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तर तांत्रिक माहितीच्या आधारे हवालदार सुरेश माळोदे यांना खबर्याकडून संशयित नाशिकरोड बसस्थानक येथे येणार असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित शुभम यास अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास भद्रकाली पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार सुरेश माळोदे, मुख्तार शेख यांच्या बथकाने बजावली.