नाशिक : इ-चलन केले म्हणून पोलिसावर रॉडने हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

नाशिक : इ-चलन केले म्हणून पोलिसावर रॉडने हल्ला

नाशिक : हेल्मेट न घातल्याने वाहतूक पोलिसाने इ- चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केल्याचा राग आलेल्या संशयित दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केली. तसेच, त्यांच्याकडील इ- चलन मशिन फोडले. या वेळी आलेले मुंबई नाका पोलिसांशीही हुज्जत घातली. त्यानंतर सदरच बेशिस्त दुचाकीस्वाराला सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेले असता, तेथेही त्याने गोंधळ घालत ठाणे अंमलदारावर रॉडने हल्ला करीत जखमी केले.

याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करून संशयितास अटक करण्यात आली आहे. रितेश अशोक ललवाणी (३०, रा. मधुकमलनगर, सावरकरनगर), असे संशयिताचे नाव आहे. वाहतूक शाखेचे हवालदार साहेबराव गवळी हे सोमवारी (ता. २०) टिळकवाडी सिग्नल येथील जलतरण तलावाजवळ कर्तव्यावर होते. या वेळी दुचाकीवरून (एमएच- १५- एफएक्स- ०९९०) संशयित रितेश विनाहेल्मेट आला. त्यास गवळी यांनी रोखले आणि त्याच्यावर ई- चलनमार्फत दंडात्मक कारवाई करीत होते. या वेळी रितेश याने हवालदार गवळी यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करीत त्यांच्याकडील ई चलन मशिन हिसकावून घेत फोडले. वाहतूक शाखेचे पोलिस अंमलदार संजय जगताप, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे दोन पोलिस तेथे आले. त्यांनाही रितेश याने दमदाटी करीत धक्काबुक्की केली. अखेर पोलिसांनी त्यास सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेले असता, तेथेही त्याने गोंधळ घातला. या वेळी रितेश याने लोखंडी रॉड उचलून पोलिस ठाण्यातील अंमलदार योगेश वायकंडे यांना मारले. त्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. याप्रकरणी हवालदार गवळी यांच्या फिर्यादीनुसार रितेश ललवाणी यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली.

टॅग्स :NashikCrime News