
RTE Admission : वेळापत्रकाची प्रतीक्षा सुरू; बालकांचे प्रवेश लांबणीवर पडणार
नाशिक : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी प्राथमिक शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना प्रवेश मिळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेत शाळांची नोंदणीप्रक्रिया झाल्यानंतर पुढील वेळापत्रकांची प्रतीक्षा सुरू झाली आहे.
येत्या दोन दिवसांत या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला सुरवात होणार आहे. या प्रक्रियेत मुलांचे आधारकार्ड स्वीकारण्याबाबतच्या निर्णयावर शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
शिक्षण विभागाकडून सूचना आल्यानंतर प्रवेशप्रक्रियेला सुरवात होईल, असे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. (RTE Admission Waiting for Timetable Begins Admission of children will be delayed Nashik News)
संबंधित शाळांची आरटीई पोर्टलकडे नोंदणीनंतर या प्रक्रियेस २३ जानेवारीपासून सुरवात झाली. त्यासाठी ३ फेब्रुवारीची मुदत १० फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली होती. यात ४०१ शाळांची नोंदणी झालेली आहे. गत वर्षी जिल्ह्यातील ४२२ शाळांनी सहभाग घेतला होता.
यंदाची प्रवेशप्रक्रिया साधारण २० फेब्रुवारीपासून सुरू होणार होती. मात्र, सरकारी लाभांच्या योजनांसाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. आरटीई प्रवेशप्रक्रिया ही सरकारी योजना असून, याद्वारे मुलांना मोफत प्रवेश मिळतो.
त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलांचे आधारकार्ड लागण्याची शक्यता आहे. मात्र, मुलांकडे आधारकार्ड नसल्यास ते प्रवेशप्रक्रियेपासून वंचित राहू शकतात. या पार्श्वभूमीवर मुलांकडे आधारकार्ड नसल्यास प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येईल का, आधारकार्ड काढताना मिळणाऱ्या पावतीवर प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येईल का, अशा काही शंकांबाबत शालेय शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.
पालकांनी आरटीई प्रवेशप्रक्रियेच्या माहितीसाठी आणि कागदपत्रांसाठी https:// student. maharashtra. gov.in या वेबसाइटवर संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
प्रवेश मेमध्येच शक्य
गत वर्षी डिसेंबरमध्ये प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होऊन जानेवारीत शाळांची नोंदणी अन् फेब्रुवारीत प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झालेले होते. यंदा जानेवारीत प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होऊन फेब्रुवारीत शाळांची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया मार्च महिन्यात सुरू होऊन मे महिन्यात बालकांचे प्रवेश होण्याची शक्यता आहे.
...अशी झाली नोंदणी
आरटीईसाठी नोंदणी झालेल्या शाळा - ४०१
प्रवेशासाठी उपलब्ध जागा - ४,८५४
राज्यभरातील शाळांची झालेली नोंदणी - ८,८०४
राज्यभरातील प्रवेशासाठी असलेल्या जागा - १,०१,६१८