
SAKAL Editorial : खळाळावी गोदामाई...
नाशिकचा श्वास म्हणजे गोदावरी... गोदावरी आहे म्हणून नाशिकचं अस्तित्व आहे... जगभरात नाशिकची ओळख गोदामातेमुळेच आहे. गोदामातेचं असणं हेच नाशिकचं असणं आहे... गोदा वजा करता नाशिक शून्य होईल...
ही जाणीव बहुतेक नाशिककरांना असूनदेखील गोदावरीकडे सातत्यानं दुर्लक्ष आपण का करतो? या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही... आत्मीयता आणि अपार श्रद्धाभाव मनात असूनदेखील नाशिककरांकडून तो कृतीत उतरलेला दिसत नाही... जेवढं प्रेम गोदामातेला मिळायला हवं तेवढं नाशिककरांकडून अद्याप मिळालेलं नाही. गोदा संकटात आहे. (SAKAL Editorial on godavari river nashik news)
असंख्य नाले, प्रदूषणयुक्त रसायनं गोदावरीला येऊन मिळतात. गलिच्छपण आणि अस्वच्छता तर सध्या गोदावरीच्या पाचवीला पुजली आहे की काय, असा प्रश्न रामतीर्थावर गेल्यावर उपस्थित होतो. आगामी कुंभमेळा २०२७ मध्ये नाशिकमध्ये भरणार आहे.
या कुंभमेळ्याच्या निमित्तानं आतापासून नाशिककरांनी तन-मनानं गोदावरीचं पावित्र्य जपण्यासाठी आणि ती खळाळून वाहण्यासाठी प्रयत्नशील व्हायला हवं. ‘सकाळ’ माध्यम समूहानं गोदावरीचं ब्रह्मगिरी पर्वतरांगांमधून पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
समाजाचं तर आपण देणं लागतोच पण गोदामाईच्या ऋणातून उतराई होण्याची ही अलौकिक संधी आम्ही मानत आहोत. ‘सकाळ’ समूहासोबत सत्संग फाउंडेशन, तरुण भारत संघ, नमामि गोदा फाउंडेशन, ‘सकाळ तनिष्का’ व्यासपीठ, ‘सकाळ यिन’ व्यासपीठ यांच्यासह अन्यदेखील एनजीओ या सत्कार्यात, सेवायज्ञात सहभागी होणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शासकीय खात्यांनीदेखील या उदात्त कार्यासाठी सक्रिय सहकार्याची, सहभागाची हमी दिली आहे.
‘सकाळ’ची उत्तर महाराष्ट्र आवृत्ती ३५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. हे औचित्य साधून आणि आगामी कुंभमेळ्यासाठी चार वर्षे शिल्लक असताना गोदामाई बारमाही प्रवाहित करण्याचा संकल्प नाशिकच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही सोडला आहे.
गोदावरीच्या सेवेची ‘सकाळ’ची ही पहिली वेळ खचितच नाही. गोदामाईच्या प्रदूषणाबाबत आम्ही मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांना कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास आम्ही भाग पाडलं होतं.
या मोहिमेनंतर साधारण १३ वर्षांनी पुन्हा गोदामाईची परिस्थिती दयनीय होऊ पाहतेय. वेळोवेळी वार्तांकन करूनदेखील गोदावरीचं सध्याचं रूप आणि स्वरूप पाहिल्यानंतर मन विषण्ण झाल्याशिवाय राहत नाही.
त्यामुळे आता केवळ नाशिकमध्ये काम करून भागणार नाही, तर यासाठी शाश्वत आणि मुळापासून प्रयत्न व्हायला हवेत. केवळ तत्कालीन स्वच्छता अभियान राबवून उपयोग नाही. गोदावरीचे मूळ स्रोत कार्यान्वित व्हायला हवेत, हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी सखोल चिंतनानंतर मांडलेला विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध होण्याचं ठरवलं आहे.
ब्रह्मगिरी पर्वत आणि शेजारील सर्वच पर्वतराजी बोडक्या होत आहेत. या पर्वतांवरील मातीचे थर झपाट्यानं कमी होत आहेत. एका अभ्यासानुसार अवघी ४० टक्के माती या पर्वतांवर शिल्लक आहे. हा वेग असाच राहिला तर ब्रह्मगिरीला शुष्क, वाळवंटी स्वरूप यायला वेळ लागणार नाही. ब्रह्मगिरीवर १०८ कुंड आहेत.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
यातील काही कुंड तर कुशावर्ताच्या चार-पाच पट मोठे आहेत. बहुतांश कुंड बंद झालेले आहेत. जलपुरुष राजेंद्र सिंह यांच्या अभ्यासानुसार पावसाचं बहुतांश पाणी जर ब्रह्मगिरीवर थांबलं तर गोदावरी बारमाही खळाळती राहणं शक्य आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील भूजल पातळी तर यामुळे वाढेलच, शिवाय संपूर्ण परिसरातलं जंगल हिरवंगार होण्यासदेखील मदत होईल.
नाशिकच्या तापमानवाढीवर तर हा रामबाण उपाय ठरेल. पशू-पक्षी आणि वन्यजीव संपदावाढीसाठी ही बाब अतिशय पूरक ठरेल. गोदावरीचं पुनरुज्जीवन करायचं झाल्यास ब्रह्मगिरीचं पुनरुज्जीवन करावं लागेल.
मात्र, त्यासाठी नाशिककरांनीदेखील स्वयंस्फूर्तीनं गोदामाईच्या सेवेसाठी पुढाकार घ्यायला हवा. जगविख्यात जलपुरुषाची ही भूमिका शिरोधार्य मानून हे शिवधनुष्य पेलायचं आम्ही ठरवलं आहे. पस्तिशीत प्रवेशत असताना याहून निर्मळ, समाजोपयोगी संकल्प अजून दुसरा कुठला ठरू शकेल...?