
SAKAL Exclusive : संशयास्पद गळतीची दखलही कुणी घेईना!
SAKAL Exclusive : आठ-पंधरा दिवसांत हमखासपणे कुठेतरी योजनेच्या जलवाहिन्या फुटतात अन् पाणी पुरवठा खंडित होतो. हे नित्याचेच गाऱ्हाणे बनले आहे.
ज्या योजनेमुळे सलग वीस वर्षाहून अधिक काळ नांदगाव, मालेगाव व देवळा तालुक्यातील शेकडो गावांची तहान भागली, अशी ५६ खेडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना सुरु झाल्यापासून आजतगायत एकदाही गळतीची गंभीर दखल घेतली गेली नाही.
परिणामी योजनेवर देखभाल दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा अक्षरश: चुराडा झाला. (SAKAL Exclusive No one took notice of suspicious leak 56 village regional water supply scheme nashik news)
उन्हाळा सुरु होताच जलवाहिन्यांची गळती सुरु होते. एक गळती रोखली की दुसरी सुरु असा पाठशिवणीचा खेळ अजूनही सुरूच आहे. याउलट गिरणा धरणावरील योजनेचे आयुर्मान संपल्याचीच आतापावेतो एकतर्फी कारणमीमांसा मात्र पुढे करण्यात येते.
तसे असेल तर, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांच्या जलवाहिन्यांना शंभर वर्षे झाली. त्यातही काही वेळा दोष निर्माण होतात. मात्र, ते दुरुस्त होतात. म्हणून या योजनेला कधीही कुणीही कालबाह्य ठरविलेले नाही.
मुंबईसह अन्य ठिकाणच्या नळपाणी पुरवठा योजनांचा आवाका मोठा असूनही अशा ठिकाणी कधीच फारशा तक्रारी करताना दिसत नाहीत. काम करणारी यंत्रणा जागरूक व सक्षम असेल, तर गळत्या रोखल्या जातात. त्या पुन्हा कधी फारशा उद्भवतही नाहीत.
मात्र, ब्रिटिश सरकारच्या अर्थसाहाय्यावर आकाराला आलेल्या या योजनेला सुरु झाल्यापासूनच देखभाल दुरुस्तीचे ग्रहण लागलेले आहे. आता योजना बंद पडण्याच्या मार्गावर असतानाही ही ग्रहण मात्र सुटलेले नाही.
योजना सुरु झाल्यापासून ती तांत्रिकदृष्ट्या कालबाह्य होईपावेतो आचके खाणारी योजना म्हणून ख्यातीप्राप्त बनली आहे. योजनेवर मूळ आराखड्यात नमूद गावांपेक्षा सरसकट झालेली वाढ सवंग प्रसिद्धी मिळवणारी ठरली.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
आता या योजनेला शाश्वत पर्याय म्हणून नव्या सुधारणेसह ७८ खेडी नळ योजनेला चालना मिळाली आहे. त्यामुळे नवी योजना सुरु होत असल्याचे मानून, आहे त्या योजनेचे मातेरे मात्र झाले आहे. सध्या या योजनेच्या देखभाल दुरुस्ती खर्चासाठी जिल्हा परिषदेला वर्षाकाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद आहे.
मग या खर्चाचे फलित नेमके काय? पाण्याच्या कमी अधिक दाबामुळे जलवाहिन्यांतील सांधे उखडून त्या नादुरुस्त होणे, त्याला गळती लागणे यात नावीन्य नसले, तरी अभियांत्रिकी कौशल्य पणाला लावून त्याची डागडुजी करणे हा एक उपाय असतो.
ते क्रमप्राप्त असते. मात्र योजनेच्या जलवाहिन्या वारंवार ठराविक अंतरात फुटणे, त्यातून लाखो लिटर पाणी वाया जाणे, एअर व्हाल्वला खुंट्या ठोकणे, अशा तांत्रिक दोषांची जबाबदारी कुणाची? सहेतुक होत असलेल्या गळत्या रोखताना त्यावर पोलीस कारवाई करावी असा प्रयत्न व्यवस्था सांभाळणाऱ्या यंत्रणेने कितीदा केला? गळतीच्या परिणामावर मार्ग शोधले जात नाहीत.
एरवी कुठल्याही नळ योजनेच्या जलवाहिन्यांवर पाच ते दहा टक्के गळतीचे प्रमाण अभियांत्रिकी दृष्टीने प्रमाणभूत असते. त्याचा बाऊ करण्याचे कारण नाही. मात्र, हेच गळतीचे प्रमाण लाखो लिटर पाण्याच्या नासाडीत होत असेल, तर पाणी कुठे तरी मुरते असा त्याचा अर्थ अधोरेखित होतो.