SAKAL Exclusive : कांद्याची लाली 300 कोटीने पडली फिकी! येवल्यात नुकसानीचा विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Red Onion News

SAKAL Exclusive : कांद्याची लाली 300 कोटीने पडली फिकी! येवल्यात नुकसानीचा विक्रम

येवला (जि. नाशिक) : कांद्याने विक्रमी उत्पन्न देऊन आर्थिक सक्षमता आणली, त्याच कांद्याने यावर्षी अनेक शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळही आली आहे.

पडलेले बाजारभाव तत्पूर्वी पावसात सडलेली रोपे, लागवड व फवारणीचा वाढलेला खर्च, शिवाय डिसेंबर-जानेवारीतील विक्री झालेल्या कांद्याला न मिळालेले अनुदान आदी कारणामुळे येवल्यातील सुमारे ४० ते ४५ हजार शेतकऱ्यांना सुमारे ३०० कोटीचे नुकसान सहन करण्याची वेळ यावर्षी आली आहे. हे नुकसान विक्रमी मानले जात आहे. (SAKAL Exclusive Onion price fell fell by 300 crore record of losses at yeola nashik news)

मागील पन्नास वर्षापासून लाल कांदा हेच येथील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक राहिले आहे. या कांद्याने अनेक शेतकऱ्यांना लखपती केले, पण एखाद वर्षीच भाव सापडतो आणि दोन-तीन वर्ष मात्र मातीमोल भावाने कांदा विक्रीची वेळ येत असल्याने गुंतवलेले भांडवल ही मिळेनासे होते, असा अनुभव शेतकरी घेतात.

यावर्षी हाच अनुभव आल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. मागील वर्षाची तेजी असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली. मात्र सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने लागवड झालेल्या कांदा शेतातच सडला, वाहून गेला. परिणामी उत्पादनातही मोठी घट झाली. त्यातच बाजारात आवक वाढू लागली आणि भाव अधिकच घसरत गेल्याने शेतकऱ्यांचे अंदाजे ३०० कोटीच्यावर नुकसान झाले आहे.

मागील वर्षी भाव टिकून असल्याने तालुक्यात येवला व अंदरसूल बाजार समितीत सुमारे ३५ लाख क्विंटलच्या आसपास कांदा पिकून शेतकऱ्यांच्या पदरात सुमारे ५०० कोटी रुपयांचे दान पडले होते. यावर्षी मात्र लागवड वाढल्याने तब्बल ४३ लाख क्विंटल कांदा विक्री होऊनही आजपर्यंत शेतकऱ्यांना अवघे ३८७ कोटीच्या आसपास उत्पन्न मिळाले आहे.

भावातील या दरीमुळे सव्वाशे ते दीडशे कोटी रुपयांचा चुना लागला आहे. त्यातही तालुक्यात पोळ्यापूर्वी लागवड होत असल्याने लाल कांदा विक्रीला लवकर येतो. यामुळे डिसेंबर व जानेवारी महिन्यात येथील बाजार समितीत सुमारे आठ लाख क्विंटल कांदा विक्री झाला होता.

मात्र या कांद्याला शासनाने जाहीर केलेले अनुदान मिळणार नसल्याने सुमारे २५ कोटी रुपयांचे नुकसान येथेही झाले आहे. याशिवाय सतत खराब वातावरण व अतिवृष्टीमुळे वाढलेला उत्पादन खर्च, अल्प दरामुळे गुंतवलेली भांडवलही हाती आले नाही तसेच मजुरीचा गगनाला भिडलेला खर्च...हा सगळा ताळमेळ पाहता ३०० कोटीच्या आसपास भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे, हे नक्की!

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

"लाल कांद्याचे आगार म्हणून येवल्याची गेल्या ३५-४० वर्षांपासून ओळख आहे. यंदा लागवड वाढली होती, मात्र अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही शेतकऱ्यांनी प्रतिकूलतेवर मात करत कांदा पिकवल्याने यावर्षी विक्रमी उत्पादन निघाले पण भावातील घसरणीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेकांना तर कांद्यासाठी गुंतवलेले भांडवल ही वसूल झाले नाही. यावर्षी मोठा तोटा शेतकऱ्यांना झाला आहे." - कैलाश व्यापारे, सचिव, बाजार समिती, येवला.

असे उत्पादन अन उत्पन्न..!

वर्ष २०२२
- विक्री झालेला कांदा - ३४ लाख क्विंटल
- सरासरी भाव - १४५० रुपये
- एकूण उलाढाल - ४९० कोटी

वर्ष २०२३
- विक्री झालेला कांदा - ४३ लाख क्विंटल
- सरासरी भाव - ९०० रुपये
- एकूण उलाढाल - ३८७ कोटी

एप्रिल २२ ते मार्च २३ दरम्यानचा भाव

(कमाल, किमान व सरासरी प्रमाणे)

एप्रिल - २०० ते १२२९ - ८२५
जून,जुलै - १०० ते १७०० - १०००
ऑगस्ट - २०० ते १४२५ - १०००
सप्टेंबर - १५० ते १९०० - १०००
ऑक्टोबर -२०० ते ३२५१- १५००
नोव्हेंबर - १५० ते ३०९० - १३००
डिसेंबर - १०० ते १९७६ - १३००
जानेवारी - २०० ते १७७२ -१२२५
फेब्रुवारी - १५० ते १४१४ - ७००
मार्च - १५० ते ८५० – ६५०

टॅग्स :NashikSakalonion crisis