SAKAL IMPACT : शहरात पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन! टवाळखोरांविरोधात कारवाईचा बडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal-news-impact

SAKAL IMPACT : शहरात पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन! टवाळखोरांविरोधात कारवाईचा बडगा

नाशिक : शहरातील वाढती टवाळखोरी, गुन्हेगारी घटना घडूनही पोलिसांना कोम्बिंग ऑपरेशनचा विसर पडला होता.

यासंदर्भात ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन राबवित रेकॉर्डवरील ५८ गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. (SAKAL IMPACT All night combing operation by police in city barrage of action against criminals nashik news)

सकाळची बातमी

सकाळची बातमी

पोलिसांच्या या कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारीला आळा बसणे शक्य होणार आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून सतर्कता बाळगली जात आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता. ३) रात्री दहापासून शनिवारी (ता. ४) पहाटे दोनपर्यंत शहर-परिसरात ऑलआऊट व कोम्बिंग ऑपरेशन मोहिम राबविण्यात आली.

यादरम्यान, आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाणेनिहाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी जाऊन पोलिसांनी १२७ गुन्हेगारांची चेकींग करून ६४ सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली. शहरातील नांदुर नाका, सिन्नर फाटा, म्हसरूळ गाव, राऊ हॉटेल, अंबड टी पॉइंट, मालेगाव स्टॅण्ड, त्रिकोणी गार्डन, जेहान सर्कल, नारायण बापूनगर, पाथर्डी फाटा, संसरी नाका, फुलेनगर, पंचवटी, वाघाडी,

मल्हारखाण झोपडपट्टी, सातपूर गाव या ठिकाणी रात्रभर पोलिसांनी गुन्हेगारांची शोध मोहिम राबविली. रेकॉर्डवरील गुन्हेगार, नाकाबंदी, ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह, तडीपार तपासणी, हॉटेल, लॉजेस तपासण्यात आले. यावेळी शहराच्या सीमावर्ती भागात नाकाबंदी करण्यात आली.

पोलीस आयुक्तालय हद्दीतून हद्दपार करण्यात आलेल्या ५१ जणांच्या घरी तपासणी करण्यात आली. त्यापैकी मिळून आलेल्या ११ जणांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

तसेच, एकूण ५८ टवाळखोरांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२/११७ प्रमाणे कारवाई करण्यात आली. चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरीच्या गुन्हेगारांना त्यांच्या घरी जाऊन छापे टाकत कारवाई करण्यात आली.

आडगांव, म्हसरुळ, पंचवटी, भद्रकाली, मुंबई नाका, सरकार वाडा, गंगापूर, सातपुर, अंबड, इंदिरानगर, नाशिक रोड, उपनगर, देवळाली कॅम्प या पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाणे प्रभारी व गुन्हे शाखेकडील अधिकारी यांच्यासह फुलेनगर, पंचवटी, निलगिरी बाग, नांदुरनाका, अश्‍वमेध नगर, शांतीनगर, मखमालाबाद गांव,

गंजमाळ, पंचशिलनगर, भारतनगर, मुंबई नाका, मल्हारखाण, कस्तुरबानगर, संत कबीरनगर, शिवाजीनगर, लेखानगर घरकुल, चुंचाळे, कामटवाडा, प्रबुद्धनगर, सातपुर गांव, अशोकनगर, वडाळा गांव, राजीवनगर, पांडवनगरी, सुभाष रोड, अश्‍विनी कॉलनी, सुंदरनगर, गांधीनगर, नारायण बापुनगर, भगुर व देवळाली कॅम्प या परिसरात कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले.

टवाळखोरांचा उपद्रव

शहराच्या उपनगरीय परिसरात टवाळखोरांचा उपद्रव वाढला आहे. विशेषत: सिडको, सातपूर, उपनगर, नाशिक रोड, पंचवटी या परिसरात चौकांमध्ये, मोकळ्या भूखंडांवर रात्रीच्या वेळी टवाळखोरांकडून धुडगूस घातला जातो.

परिसरातील नागरिकही त्रस्त झाले आहेत. या टवाळखोरांवर शहर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने होते आहे. रात्रीची गस्तीपथकांकडूनही मध्यरात्री टवाळक्या करणाऱ्यांवर कारवाई झाल्यास टवाळखोरी मोडीत निघण्यास मदत होणार आहे.