SAKAL Impact: मारूतीवाडीकरांची पाण्यासाठी पायपीट थांबणार! | SAKAL Impact water of Marutiwadikar Help of 4 tanks for water from social group of Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Officials giving water tanks by Jain Social Group.

SAKAL Impact: मारूतीवाडीकरांची पाण्यासाठी पायपीट थांबणार!

SAKAL Impact : कुरुंगवडी ग्रामपंचायत हद्दीतील मारुतीवाडी येथे जवळपास २५ आदिवासी कुटुंब राहत असून येथे आत्तापर्यंत शासनाने एकही रुपये खर्च करून कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा पुरविलेल्या नाहीत.

या वाडीमध्ये तीनशे लोकवस्ती असून त्यांना साधे पिण्यासाठी पाणीही उपलब्ध करून दिलेले नाही. पाण्यासाठी महिलांची पायपीट अतिशय जिवघेणी आहे.

याबाबत ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत पुण्याच्या सोशल ग्रुपने त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली आहे. त्यामुळे येथील नागरिकांची पायपीट आता थांबणार आहे. (SAKAL Impact water of Marutiwadikar Help of 4 tanks for water from social group of Pune)

या ठिकाणी कुरुंग किल्ला असून येथील नागरिक किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका झऱ्यावर जाऊन पाणी भरून ते पाणी पिण्यासाठी वापरत होते. याची माहिती एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनीही गटविकास अधिकारींना निवेदन देऊन पुरुषांचा हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला. या नागरिकांचे पाण्यासाठी होणाऱ्या गैरसोयीबाबत ‘सकाळ’ने वृत्त छापले होते. त्यानंतर प्रशासनही जागे झाले.

त्यानंतर तात्काळ या वाडीवर टॅकर सुरू करण्यात आले. विहीर अधिग्रहण करून पाणी तपासणी केली. ‘सकाळ’मधील बातमीच्या माहितीच्या आधारे पुणे येथील सामाजिक काम करणाऱ्या जैन सोशल ग्रुपच्या पदाधिकारींना मिळाली.

महाराष्ट्र रिझन चेअरमन दिलीप मेहता, व्हाईस चेअरमन हसमुख जैन, झोन कॉर्डिनेटर चंचलबेन कुचरिया, नोबेलचे शेवंती ओसवाल, शीतल मुरगुंडे, जीतूभाई, कमलेशभाई, सुनीलभाई, सचीनभाई, संजयभाई, राजुभाई, सचीनभाई, जयंतीलाल, कपीलभाई आदी पदाधिकारींनी दखल घेत या वाडीला चार पाण्याच्या मोठ्या टाक्या दिल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यामुळे येथील रहिवाशांच्या डोक्यावर असलेला हंडा स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनी खाली आला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वाडीला पाणी मिळाले. सोमवारी (ता.२२) या आदिवासी वाडीत खरी दिवाळी साजरी केली. समाजात असे मदत करणारे लोक आहेत म्हणून कुठेतरी न्याय मिळतो असे एल्गार संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी व्यक्त करून ‘सकाळ’चे आभार मानले.

"आमच्या वाडीला जैन सोशल ग्रुपतर्फे पाण्याच्या टाक्या मिळाल्या. त्यामुळे आमचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता तात्पुरता तरी सुटला आहे. आम्ही या ग्रुपचे मनापासून आभार मानतो. आता आमच्या महिलांना रात्रीअपरात्री पाणी भरण्यासाठी जाण्याची वेळ येणार नाही."

- काळू निरगुडे, ग्रामस्थ.

"आम्हाला आज खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले, आता आम्हाला रात्रीच्या वेळी अंधारात हंडाभर पाण्यासाठी जावे लागणार नाही. जैन सोशल ग्रुप आणि प्रशासनाचेही आम्ही आभार मानतो."

- सौ. किसनाबाई मेंगाळ, ग्रामस्थ.