
Sakal Special : सराईत गुन्हेगारांकडून अल्पवयीन मुलांचा वापर; शहरात बोकाळतेय बालगुन्हेगारी
Nashik News : गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचे वाढते प्रमाण पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दोन दिवसांपूर्वी सिडकोत वाहनांची तोडफोड घटनेत अटक केलेल्या संशयितांत तिघे- चौघे अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. टवाळखोरीतून अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे आकर्षित होतात.
तर, गंभीर गुन्हा करूनही अल्पवयीन असल्याचा फायदा घेतला जातो. त्यामुळे ही वाढती बालगुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. (Sakal Special Use of minors by innkeepers Juvenile delinquency is rampant in city Nashik News )
उपनगरी वसाहतीमध्ये कामगारवर्ग बहुसंख्येने आहे. पालक कामानिमित्ताने घराबाहेर पडल्यानंतर मुले शाळेत न जाता टवाळखोरांच्या नादी लागतात. टवाळखोर वा सराईत गुन्हेगार अल्पवयीन मुलांना खाण्या-पिण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतात.
मंगल कार्यालये, रेल्वेस्थानक, बसस्थानक, आठवडे बाजार, गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या करणारी अल्पवयीन मुलांच्या टोळ्या कार्यरत आहेत. सिडको, सातपूर, उपनगर, नाशिक रोड, पंचवटी, जुने नाशिक या परिसरात अल्पवयीन बालगुन्हेगारांच्या टोळ्या कार्यरत आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बालगुन्हेगारांचे अड्डे
गंगाघाट, निमाणी बसस्थानक, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा, पेठ रोड, फुलेनगर, बाजार समिती आवारात चोऱ्यामाऱ्या, हाणामाऱ्या, पाकिटमारी, मोबाईल चोरी, दुचाक्या चोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अल्पवयीन गुन्हेगारांच्या टोळ्याच कार्यरत आहेत.
तसेच, आठवडे बाजार वा गंगाघाटावर आलेल्या पर्यटकांची पर्स, मोबाईल, मौल्यवान वस्तू चोरून नेण्याच्या ज्या घटना घडतात, त्यामागेही अल्पवयीन गुन्हेगारच असतात. यासंदर्भात पोलीसात तक्रारी दाखल होतात.
त्यातून संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर ते अल्पवयीन असल्याने बालनिरीक्षण गृहात दाखल केले जाते आणि काही दिवसात ते पुन्हा बाहेर येऊन परत त्यांच्या चोऱ्यामाऱ्या सुरू होतात.
विशेषत: गंगाघाट परिसर, पंचवटीतील झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलांचा वापर त्याच परिसरातील सराईत गुन्हेगार करून घेत असल्याचे पोलिस तपासातही वारंवार समोर आलेले आहे. सराईतांकडून अल्पवयीन मुलांना नशेची सवय लावून त्यांना त्याच्या आहारी केले जाते. त्यामुळे ही मुले शाळेमध्ये न जाता गंगाघाटावर जाऊन नशा करतात. नशेसाठी सराईत त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतात.
आकडेवारी बोलतेय
* २०१६ ते एप्रिल २०२३ अखेर
* ४८२ गुन्हे
* ६५२ अल्पवयीन गुन्हेगार
हिंसकवृत्तीत वाढ
गेल्या वर्षी त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमात लहानग्या चिमुरड्याचा आश्रमातीलच १२ वर्षांच्या मुलाने गळा आवळून खून केला होता. लहान मुलांमध्ये दुसऱ्याचा जीव घेण्यापर्यंत गेलेली मजल चिंताजनक आहे. त्याचप्रमाणे, धारदार हत्यारे बाळगून वार करण्यापर्यंत बाल गुन्हेगार घाबरत नाहीत.
सिडको, सातपूर या कामगार वसाहतींमध्ये मारहाण, तोडफोड, मुलींचे अपहरण, वार करणे, चोऱ्यामाऱ्यांमध्ये बालगुन्हेगारांचाच सहभाग मोठ्याप्रमाणात असतो. साधारणत: १६ ते १८ वयोगटातील बाल गुन्हेगारांमध्ये हिंसकवृत्ती वाढली आहे.
वय ठरतंय अडसर
अल्पवयीन वयोमर्यादा १८ वर्षापर्यंत आहे. तर बालगुन्हेगारीमध्ये १६ ते १८ वयोगटातील मुलांचे प्रमाण अधिक आहे. गुन्ह्यात अल्पवयीन मुलांना अटक करता येत नाही. अदखलपात्र गुन्हा असेल
तर पालकांसमक्ष समज दिली जाते. गंभीर गुन्हा असेल तर बालनिरीक्षणगृहात रवानगी करून बाल न्यायालयात खटला चालविला जातो. त्यातही फारशी कठोर शिक्षा नसल्याने १६ ते १८ वयोगटातील बालगुन्हेगार सज्ञान होऊन अट्टल गुन्हेगारीकडे वळताना दिसतो.
हे करता येऊ शकेल
* कामगार वसाहतींमध्ये सर्व्हेक्षण करून शालाबाह्य मुलांचा शोध घेणे
* शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मूळप्रवाहात आणणे
* शाळेतून ड्रॉप झालेल्यांना पुन्हा शाळेत आणणे
* घरात एकटी राहणाऱ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करावी
* पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष असावे
* मुलं कोणाच्या संगतीत आहेत, याची पालकांनी माहिती घेणे
* परिसरातील टवाळखोरांच्या कट्ट्यांवर पोलिसांकडून कारवाई
* गस्ती पथकांची गस्ती वाढवावी
"पालकांच्या दुर्लक्षामुळे मुले गुन्हेगारीकडे वळतात. बालगुन्हेगारी वाढीला समाज कारणीभूत आहे. कामगार वसाहतीतील सर्वाधिक मुले शाळांमध्ये जात नसल्याने ते टवाळखोरीकडे वळतात आणि त्यातून ते बालगुन्हेगार होतात.
पोलिसांना कठोर कारवाई करता येत नाही. परंतु ते बालगुन्हेगारीकडे वळू नयेत, त्यासाठी सामाजिक दायित्वातून उपाययोजना करणे आवश्यक आहे."
- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा.