Sanjay Raut : 'महाराष्ट्रात स्वातंत्र्याचा कचरा !' नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यावर संजय राऊत भडकले | Sanjay Raut statement about independence in maharashtra nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

Sanjay Raut : 'महाराष्ट्रात स्वातंत्र्याचा कचरा !' नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यावर संजय राऊत भडकले

Nashik News : राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याने पोलिसांनी सरकारचे आदेश मानू नये असे वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी मी कारवाईला घाबरत नसल्याचे सांगताना महाराष्ट्रात स्वातंत्र्याचा साफ कचरा झाल्याचे वक्तव्य केले आहे. (Sanjay Raut statement about independence in maharashtra nashik news)

राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये खासदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. ‘हे सरकार तीन महिन्यात जाणार, सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारने काढलेले आदेश बेकायदेशीर असतील.

प्रशासन आणि पोलिसांना माझे आवाहन आहे की, बेकायदा सरकारचे, बेकायदा आदेश पाळू नका. सरकार तीन महिन्यात जाईल. बेकायदा आदेश पाळाल तर तुम्ही अडचणीत याल. न्यायालयाचा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे.’

असे वक्तव्य केल्याने त्याचे पडसाद उमटले. राऊत यांच्या वक्तव्यानंतर सार्वजनिक शांतता बिघडण्याची व पोलिसांविषयी समाजात गैरसमजाची भावना निर्माण होईल त्यामुळे मुंबई नाका पोलिस ठाण्यात अप्रीतीची भावना चेतावणे या अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यावर राऊत यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली. त्यात ते म्हणतात,‘ नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रिम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे ‘गठन’ बेकायदेशीर ठरले आहे.

व्हिपपासून शिंदे यांना गटनेतेपदी निवड करण्यापर्यंत सर्वच घटनाविरोधी ठरवले आहे. सोळा आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील अशी स्थिती आहे. बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनाने पाळू नयेत.

भविष्यात खटले दाखल होतील असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का? सरकारने थेट गुन्हाच दाखल केला. मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल.’