
Sanjay Raut : खा. राऊत यांचा ठाणे पोलीसांनी नोंदविला जबाब
नाशिक : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, आपल्या जीवाला धोका असल्याचे आरोप करीत, तसे पत्र ठाणे पोलीस आयुक्तांना दिले होते. याची गंभीर दखल घेत, ठाणे पोलिसांच्या पथकाने नाशिकमध्ये दाखल होत खा. संजय राऊत यांचा सहा पानी जबाब नोंदवून घेतला.
दरम्यान, जबाबानुसार चौकशी केली जाणार असल्याचे सांगत, ठाणे पोलिसांनी अधिकचे बोलणे टाळले. (Sanjay Raut statement recorded by Thane police nashik news)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे यांनी गुंड राजा ठाकूर याला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप करीत खा. संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांना तसे पत्र लिहिले होते.
सदरील पत्र ट्विटर हँडलवरून ट्विट करुन आपली सुरक्षा हटविण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला होता. या प्रकरणाची गृहखात्याने दखल घेऊन ठाणे पोलिसांना तपासाचे आदेश दिले.
त्यानुसार ठाणे पोलिस आयुक्तालयातील वर्तकनगर विभागाचे सहायक आयुक्त गजानन काब्दुले व गुन्हेशाखेकडील खंडणीविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्यासह अन्वेषण पथकाकडील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक मंगळवारी (ता. २१) रात्री नाशिकमध्ये दाखल झाले.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
त्यांनी बुधवारी (ता. २२) सकाळी खा. राऊत हे थांबलेल्या हॉटेल एक्स्प्रेस इन येथे भेट घेतली. त्यानंतर राऊत यांचा सहा पानांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. यासंदर्भात अद्याप पुरावे उपलब्ध नसल्याने मिळालेल्या जबाबाच्या सहाय्याने तपास सुरू असल्यचे सांगत अधिक माहिती देणे ठाणे पोलिसांनी टाळले.
सुरक्षा प्रोटोकॉलनुसारच
खा. राऊत नाशिक दौऱ्यावर असताना, त्यांच्या सुरक्षेत वाढ केल्याची चर्चा शहरात रंगली होती. मात्र नाशिक शहर पोलिसांनी खा. राऊत यांच्या सुरक्षेत कोणतीही वाढ केली नसल्याचे सांगत, प्रोटोकॉलनुसार बंदोबस्त नियोजित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.