Nashik News : मालेगावला शिवसेनेकडून संजय राऊतांचा पुतळा दहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena activists burning effigy of MP Sanjay Raut.

Nashik News : मालेगावला शिवसेनेकडून संजय राऊतांचा पुतळा दहन

मालेगाव (जि. नाशिक) : गिरणा कारखान्यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर केलेल्या आरोपांचे येथे तीव्र पडसाद उमटले. संतप्त शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोसम चौकात राऊत यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या पुतळ्याचे दहन केले.

यावेळी कार्यकर्ते व पोलिसांमध्ये शाब्दीक चकमक झाली. खासदार राऊत यांनी २६ मार्चपर्यंत तालुक्यातील व राज्यातील जनतेची माफी मागावी अन्यथा त्यांना मालेगाव दौऱ्यात जाब विचारला जाईल असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. (Sanjay Raut statue burnt by Shiv Sena in Malegaon Nashik News)

दाभाडी येथील गिरणा कारखान्यासंदर्भात खासदार राऊत यांनी पालकमंत्री दादा भुसेंवर गिरणा ॲग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखाचे शेअर्स गोळा केल्याचा आरोप केला. हे वृत्त समजताच शिवसेना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर भुसे यांच्या संपर्क कार्यालयात जमले.

जिल्हाप्रमुख संजय दुसाने, ज्येष्ठ नेते सुनील देवरे, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, माजी उपमहापौर नीलेश आहेर, महानगरप्रमुख विनोद वाघ, प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.

मोसम चौकात मोर्चा आल्यानंतर कार्यकर्त्यांनी खासदार राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा दहन केला. यावेळी कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वाद झाला. अविष्कार भुसे यांनी समन्वय साधत वाद मिटविला. आंदोलनामुळे मोसम चौकातील वाहतूक विस्कळित झाली.

यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. सुनील देवरे म्हणाले, खासदार राऊत यांना मी ३५ वर्षापासून ओळखतो. २६ मार्चला मालेगाव दौऱ्यावर आमच्या समोर बसा. तुम्ही शिवसेनेसाठी काय केले व आम्ही शिवसेनेसाठी काय केले हे समोरासमोर बसून जनतेला सांगा. खोटे आरोप करून दिशाभूल करू नका.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

अन्यथा शिवसेना काय आहे हे तुम्हाला दाखवून देवू. जिल्हाध्यक्ष दुसाने यांनी गिरणा कारखाना वाचावा, कारखाना सुरु राहावा यासाठी पालकमंत्री भुसे यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्यावर केलेले खोटे आरोप जनता सहन करणार नाही. हिरे घराण्याने सहकारी संस्था लयास आणल्या. श्री. वाघ म्हणाले, खोटे आरोप करून मालेगावची शांतता भंग करू नका.

२६ मार्चच्या सभेसाठी तालुक्यात चौक सभा होत आहेत. यात पोपटपंची करणारे बिनबुडाचे आरोप करीत आहेत. पालकमंत्री भुसे व आमच्या वाटेला आले तर तुम्हाला तुमची जागा दाखवून देवू. खोटे आरोप केल्यास सभेच्या ठिकाणी जाब विचारू. आंदोलनात गोविंद गवळी, यशपाल बागूल, किरण पाटील, गजू माळी आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

"गिरणा कारखान्याच्या शेअर्स प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ४ फेब्रुवारीला अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. मुळात गिरणा कारखाना ३० कोटीच्या आतच गेला. त्यासाठी १७८ कोटी जमा केल्याचा आरोप हास्यास्पद आहे. राऊत यांनी २६ मार्चपर्यंत मालेगावच्या जनतेची माफी मागावी. अन्यथा शिवसेना त्यांना त्यांची जागा दाखवेल." - नीलेश आहेर, माजी उपमहापौर