
Ram Navami 2023 : सरदार चौक ते काळाराम मंदिर रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद!
नाशिक : येत्या गुरुवारी (ता. ३०) रामनवमी आहे. यानिमित्ताने पंचवटीतील काळाराम मंदिरात श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असल्याने गुरूवारी सरदार चौक ते काळाराम मंदीर हा रस्ता सर्वच वाहनांसाठी बंद राहणार असल्याचे आदेश पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिले. (Sardar Chowk to Kalaram Mandir road closed for traffic tomorrow Ram Navami 2023 nashik news)
पंचवटीतील काळाराम मंदिरात श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव श्रीरामनवमी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यासाठी शहरातीलच नव्हे तर राज्य-परराज्यातून भाविकांची गर्दी होत असते.
तर, सरदार चौक ते काळाराम मंदिराचा पूर्व दरवाजा या दरम्यान असलेला रस्ता अरुंद आहे. त्यामुळे रामनवमीच्या दिवशी या मार्गावर भाविकांची गर्दी व वाहतूक यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.
हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार
त्यामुळे येत्या गुरुवारी (ता. ३०) सकाळी सात वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत सरदार चौक ते काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा या रस्त्यावर वाहतुकीला प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. या रस्त्यावरून हातगाड्या, बैलगाड्या या सर्व प्रकाराच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल.
सदरील बंदी आदेश पोलीस दलातील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांना लागू राहणार नाहीत, असेही उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिलेल्या अधिसूचनेतून स्पष्ट केले आहे.