Nashik Fraud Crime : अंतापूर ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा गैरव्यवहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud Crime

Nashik Fraud Crime : अंतापूर ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा गैरव्यवहार

नाशिक : सटाणा तालुक्यातील ताहाराबाद, भाक्षी ग्रामपंचायत गैरव्यवहारांची चौकशी सुरू असतानाच अंतापूर येथील ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्या संगनमताने लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांनी पुराव्यानिशी ही तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत १८ प्रकरणांचे पुरावेच मुख्य कार्यकारी अधिकारी आशीमा मित्तल यांना देण्यात आले. (scam of lakhs of rupees in Antapur Gram Panchayat Nashik Fraud Crime)

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने अनेक बांधकामे निकृष्ट दर्जाची केली आहे. कामांमध्ये अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे म्हटले आहे.

यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रस्त्यांचे झालेले काँक्रिटीकरण, भूमिगत गटार, स्मशानभूमी, ग्रामपंचायत सेसमधून केलेला खर्च, पाण्याच्या टाकी खालील काँक्रिटीकरण, व्यायाम शाळा, जि. प. प्राथमिक शाळा, अंगणवाडी बांधकाम, तलाठी कार्यालय दुरुस्ती, कचरा कुंड्या व कचरा विल्हेवाट, शौचालय लाभार्थी यादी, महिला शौचालय बांधकाम व शौचालय साहित्य खर्च यांची खोटी बिले दर्शवून लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

कोरोना काळात साबण व मास्क वाटपावर भरमसाट खर्च दाखवला असून ग्रामस्थांना प्रत्यक्षात वाटप करण्यात आलेले नाही. गावातील बांधकामांसाठी इ- टेंडरिंग झाले असता फक्त एकाच ठेकेदारास सर्व बांधकामांचे टेंडर देण्यात आले असून ही बाबही संशयास्पद असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे.

तक्रार अर्जावर अनिकेत सोनवणे, मुकेश पवार, विलास गवळी, चंद्रकांत गवळी, गोविंद मानकर, श्रीकांत पवार, दिगंबर खैरनार, ईश्वर मानकर, युवराज जाधव आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

विशेष म्हणजे सर्व कामांचे निविदा झालेले असताना एकाच ठेकेदाराला कामे दिल्याचेही पुराव्यावरून दिसून येत असल्याने या कामाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित शिष्टमंडळास दिले.