
Nashik News : विमा कंपनीच्या नावाखाली दाखविले आमिष; ज्येष्ठ नागरिकाला 95 हजारांचा गंडा
नाशिक : इंडिया फस्ट लाईफ इन्शुरन्स कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगून पॉलिसीचे दोन हप्ते भरल्यानंतर पूर्ण रक्कम काढता येते, असे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाला एकाने ९५ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी अज्ञात संशयिताविरोधात मुंबई नाका पोलिसात सायबर कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६३ वर्षीय नवलचंद मदनलाल जैन (रा. योगीजन अपार्टमेंट, अशोकामार्ग) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना गेल्या ३ ते ८ फेब्रुवारी या दरम्यान अज्ञात संशयिताने जैन यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला आणि इंडिया फस्ट लाईफ इन्शुरन्स कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले.
यावेळी संशयिताने कंपनीच्या विमा पॉलिसीचे दोन हप्ते भरले तर विमा पॉलिसीची संपूर्ण रक्कम काढून घेता येईल, असे आमिष दाखविले. त्यासाठी संशयिताने जैन यांना वारंवार संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना आडीएफसी बँकेच्या मुंबईतील लोअर परेल बँकेच्या खात्यावर पहिल्यांदा ३० हजार रुपये, त्यानंतर पुन्हा ३५ हजार रुपये आणि तिसर्यांदा पुन्हा ३० हजार रुपये वर्ग करण्यास भाग पाडले.
हेही वाचा: तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
त्यानंतर संशयिताने जैन यांना इंडिया फस्ट लाईफ इन्शुरन्स कंपनीचे बनावट पत्र पाठविले. त्यानुसार जैन हे भरलेले विम्याचे पैसे काढण्यासाठी गेले असता, त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात सायबर कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत आहिरे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.