
SAKAL Impact News : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली दिलगिरी
नांदगाव (जि. नाशिक) : बस रस्त्यातच बंद पडल्याने "लालपरीने हुकविला लग्नाचा मुहूर्त" या बातमीची दखल घेत परिवहन महामंडळाच्या नाशिक येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नांदगाव येथे चौकशीसाठी येत आले असता वरपक्षाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना झालेल्या त्रासाबद्दल महामंडळाच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. तसेच या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात येत असल्याचेही सांगितले. (Senior officials expressed apology SAKAL Impact Nashik News)
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
नांदगाव येथील एका कुटुंबाने मुलाच्या लग्नासाठी नांदगाव आगाराची बस प्रासंगिक कराराने घेतली होती. लग्न संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गावात हे लग्न होते. गुरुवारी दुपारच्या मुहूर्तावर ठरलेले होते. नांदगाव आगाराच्या कार्यालयाकडून चालकाला नांदगाव ऐवजी नस्तनपूर असा चुकीचा पत्ता दिल्याने बस एक तास नियोजित वेळेपेक्षा उशिरा आली.
नांदगाव येथूनच निघण्यास उशिरा झाला. साधारण पन्नास किमी अंतर गेल्यावर बस रस्त्यातच बंद झाली. आगार व्यवस्थापक यांना त्वरित माहिती दिली असता त्यांनी अर्धा तासात आपल्या दुसरी बस उपलब्ध होईल असे सांगितले परंतु सुमारे अडीच तासानंतर बस उपलब्ध झाली.
त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा लग्न सुमारे तीन तास उशिराने लागले होते. या घटनेचे वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर या बातमीची दखल घेऊन नाशिक येथून परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी नांदगाव येथे चौकशीसाठी आले असता त्यांनी स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेऊन तसेच संबंधित कुटुंबाची भेट घेत झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.