Nashik News: खेळाडूंसाठी स्वतंत्र आश्रमशाळा उभारणार; आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांची ग्वाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tribal Development Minister Dr. Vijay Kumar Gavit while inaugurating the sports competitions organized by Tribal Development Commissionerate

Nashik News: खेळाडूंसाठी स्वतंत्र आश्रमशाळा उभारणार; आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांची ग्वाही

नाशिक : आदिवासी आश्रमशाळेतील खेळाडूंमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत खेळण्याची क्षमता आहे. त्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे खेळाडू मुले व मुलींसाठी स्वतंत्र आश्रमशाळा सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिली. (Separate ashram school will set up for sportsmen Testimony of Tribal Development Minister Dr Vijayakumar Gavit Nashik News)

आदिवासी विकास आयुक्तालयातर्फे महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या ओव्हल ग्राउंडवर आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ चे उदघाटन आज (ता.१०) त्यांच्या हस्ते झाले.

यावेळी आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे, आदिवासी विकास विभागाचे अप्पर सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. नयना गुंडे, चंद्रकांत खाडे व्यासपीठावर उपस्थित होते.

मंत्री डॉ.गावित म्हणाले, शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री यांनी दिले आहे. पुढील वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आदिवासी खेळाडूंचे प्रमाण ५० टक्के असायला हवे, यादृष्टीने एकलव्य क्रीडा स्पर्धांमध्येही सहभागी करून घेण्याचे प्रयोजन आहे. राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सुविधा आदिवासी विकास विभागातर्फे उपलब्ध करून दिल्या जातील.

इतकेच नव्हे तर आदिवासी विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेसोबतच इंग्रजी, गणित व विज्ञान या भाषेतून शिक्षण देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धांना प्रारंभ झाला. आयुक्त डॉ. गुंडे यांनी प्रास्ताविकात आयोजनाची माहिती दिली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिमची सुंदर कला सादर केली. मुंढेगाव आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा भावना जागृत करणारे नृत्य सादर केले. दिंडोरी तालुक्यातील टिटवे आश्रमशाळेतील ४४ विद्यार्थ्यांनी ‘रिदम योगा’ सादर करत सर्वांचे लक्ष वेधले.

विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या खेळाडूंचा सत्कार मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते करण्यात आला. अप्पर आयुक्त तुषार माळी यांनी आभार मानले. यावेळी आदिवासी विकास विभागाचे अधिकारी व खेळाडू उपस्थित होते.

आदिवासी बांधवांसाठी ‘टोल फ्री’ क्रमांकाची सुविधा

आदिवासी बांधवांना रेशनकार्ड, आधारकार्ड, प्रशासकीय दाखले, शासकीय योजनांविषयी माहिती फोनद्वारे मोफत मिळावी यासाठी आदिवासी विकास विभागाने १८००२६७०००७ हा टोल फ्री क्रमांक सुरु केला आहे. त्याचे लोकार्पण आदिवासी विकास मंत्री डॉ.गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अशा होतील स्पर्धा

आदिवासी आयुक्तालयातर्फे पुढील तीन दिवस १४, १७ व १९ या वयोगटातील एकूण १८२१ खेळाडू विविध क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत. नाशिक, नागपूर, अमरावती व ठाणे या चार विभागातून आलेल्या खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. मंत्री डॉ.गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक व नागपूर या विभागांमध्ये कबड्डीचा सामना घेण्यात आला. तसेच ४ बाय ४०० मीटर रिले स्पर्धेचे उदघाटनही श्री. गावित यांनी केले.

..मंत्री डॉ.गावित म्हणाले

- 'ड' यादीमध्ये नाव नसलेल्या आणि स्वत:चे घर नाही अशा सर्वांना घरे देणार

- आदिवासी गावे, वाड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांची सुविधा

- स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी करिअर ॲकॅडमी उभारणार

- गणित, इंग्रजी व विज्ञान या अवघड वाटणाऱ्या विषयांसाठी प्रत्येक शनिवार व रविवारी ऑनलाइन मार्गदर्शन

- कोंडी, कोकणा व पावरी या स्थानिक भाषांसह हिंदी, इंग्रजी व मराठीत मिळणार शिक्षण