B Sc Nursing CET Exam : बी. एस्सी नर्सिंगसाठी आता स्वतंत्र सीईटी; अर्ज दाखल करण्याची आज अंतीम मुदत | Separate CET exam for BSc Nursing nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bsc nursing cet exam

B Sc Nursing CET Exam : बी. एस्सी नर्सिंगसाठी आता स्वतंत्र सीईटी; अर्ज दाखल करण्याची आज अंतीम मुदत

Nashik News : वैद्यकीय क्षेत्रात उत्तम करिअर करण्यासाठी बी. एस्सी नर्सिंग कोर्स हा एक चांगला पर्याय आहे. नामांकित हॉस्पिटलमध्ये मोठ्या पगाराची नोकरी नर्सिंग केल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळते. त्यामुळे या क्षेत्राकडे कल वाढला आहे. (Separate CET exam for BSc Nursing nashik news)

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने यंदापासून स्वतंत्र एमएच- बी. एस्सी नर्सिंग सीईटी घेण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरावा लागणार असून, त्यासाठी शुक्रवारी (ता. २६) अंतीम मुदत आहे.

वैद्यकीय क्षेत्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बी. एस्सी. नर्सिंग लोकप्रिय होत आहे. नर्सिंग क्षेत्रात करिअरसह चांगल्या पगाराची नोकरी या पदवीनंतर सहजपणे मिळते. बी. एस्सी. नर्सिंग हा इयत्ता बारावी (विज्ञान)नंतर ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. मागील वर्षापर्यंत नीट ही प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना नर्सिंगसाठी प्रवेश मिळत असे.

एखाद्या महाविद्यालयात ५० प्रवेश क्षमता असल्यास ४३ प्रवेश केंद्रीयभूत पद्धतीने, तर सात जागांवर प्रवेश देण्याचा अधिकार संस्थेला होता. आताही हिच पद्धत राहणार असली, तरी नीट परीक्षेऐवजी विद्यार्थ्यांना बी. एस्सी. नर्सिंगची स्वतंत्र सीईटी द्यावी लागणार आहे. दरम्यान, दोन वर्षाच्या फक्त मुलींसाठीच्या एएनएम नर्सिंग अभ्यासक्रम व तीन वर्षाच्या जीएनएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावी उत्तीर्ण हीच अट असून, त्यासाठी प्रवेश परीक्षेची गरज नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सीईटी सेलकडून या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु असून, पात्र विद्यार्थ्यांना २६ मेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. परीक्षा शुल्‍क भरण्यासाठी २७ मेपर्यंत मुदत आहे. ही सीइटी शंभर गुणांची होणार असून प्रत्‍येकी एक गुणासाठी शंभर वस्‍तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्‍न विचारले जाणार आहेत.

राज्‍य शिक्षण मंडळाच्‍या अभ्यासक्रमावर आधारित भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र, जीवशास्‍त्र, इंग्रजी आणि नर्सिंग ॲप्टिट्यूड या विषयांच्‍या प्रत्‍येकी वीस प्रश्‍नांचा त्यात समावेश असेल. सध्या अर्ज भरणे सुरु असून, त्यानंतर परीक्षेचा कार्यक्रम जाहीर होऊ शकेल.

"बी. एस्सी नर्सिंगच्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असून, वैद्यकीय क्षेत्रात नर्सिंगमध्ये यामुळे चांगले करिअर करता येते. आमच्या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी नामांकित हॉस्पिटलमध्ये मोठ्या पगारावर काम करत आहेत. यंदापासून सीईटी अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांना हा बदल माहिती होणे गरजेचे आहे. इच्छुकांनी हा बदल समजून घेऊन प्रवेशाची तयारी करावी." -रुपेश दराडे, संचालक, जगदंबा शिक्षण संस्था, येवला.

टॅग्स :NashikCET ExamBSCNursing