Water Supply Scheme : नांदगावसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मार्गी लागणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Supply

Water Supply Scheme : नांदगावसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मार्गी लागणार

नांदगाव (जि. नाशिक) : गिरणा धरणातून नांदगाव शहरातील स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेला मंजूर मिळण्याचे संकेत असल्याने शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.

महाराष्ट्र नगरोत्थान महाभियान अंतर्गत प्रधान सचिव (२) यांच्या गठीत केलेल्या राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीच्या गुरुवारी (ता.९) होणाऱ्या बैठकीत योजनेला मंजूर मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (separate water supply scheme will be launched for Nandgaon nashik news)

गिरणा धरणातून नांदगाव शहरासाठी स्वतंत्ररीत्या करावयाच्या समांतर नळपाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता मिळण्याचे संकेत आहे. नांदगावसह राज्यातील विविध नगरपालिकांच्या पाणी पुरवठा योजनांच्या प्रकल्पीय आराखड्याबाबत मंत्रालयात उच्चस्तरीय समितीपुढे सादरीकरण झाल्यानंतर अंतिमतः प्रशासकीय मंजुरीचा पुढचा टप्पा असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.

मनमाड शहराला योजना मंजूर केल्यानंतर आता नांदगावची नळपाणी पुरवठा योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. आमदार सुहास कांदे यांनी शहराच्या या योजनेच्या पाठपुराव्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रधान सचिवाकडे होणाऱ्या बैठकीत वित्तीय आकृतिबंध व त्याअनुषंगाने पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

५० कोटी रुपये खर्च

नांदगाव शहरासाठी गिरणा धरणातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेतंर्गत दर मानसी १३५ लिटर पाणी, त्यानुसार धरणातील पाण्याचे आरक्षण मंजूर होईल. गिरणा धरण ते नांदगाव शहर एकूण २८ किमी अंतरावर मुख्य जलवाहिनीसाठी ५० कोटीहून अधिक खर्च होणार आहे.

त्यासाठी २०४१ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयाजवळ ६० लक्ष लिटर क्षमतेचे मुख्य जलशुद्धीकरण केंद्र असेल. लक्ष्मी नगर येथे ३ लाख ६५ हजार लिटर चा जलकुंभ तर गुरुकृपा कॉलनी येथे चार लक्ष लिटर चा जलकुंभ असेल.

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदार संघातील सर्वच विषय मार्गी लावताना भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मनमाड आणि नांदगाव येथील वर्षानुवर्षे रेंगाळत असलेले पिण्याच्या पाण्याच्या योजना मार्गी लागत आहे." - सुहास कांदे, आमदार

टॅग्स :Nashikwater supply scheme