
Motivational News : शीतलने अखेर संधीचे सोने केलेच; जिद्द, मेहनतीच्या बळावर झाली पोलिस!
Nashik News : मनात जिद्द..,मनगटात ताकद आणि प्रबळ मानसिकता...असली की कुठलेच यश दूर नाही हे दाखवून दिले आहे शीतल रामकृष्ण चव्हाण उर्फ शीतल प्रमोद पवार या युवतीने...एका मुलीची आई असूनही तिने पोलिस दलात भरतीसाठी खडतर मेहनत करीत यशाला गवसणी घातली आहे.
आज सुरेगाव (ता. येवला) येथील माहेर असून नाशिकचे सासर आहे. प्रयत्नपूर्वक यश मिळवीत तिने माहेरचे नाव मोठे केले आहे. (Shital of Suregaon Perseverance and hard work made police Dhule News)
मराठवाड्याच्या हद्दीवरील व तालुक्यातील शेवटच्या टोकाचे गाव आडसुरेगाव येथील रामकृष्ण चव्हाण यांची कन्या शीतल महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाली आहे. सात वर्षापूर्वी तिचे लग्न झाले असून एक मुलगी देखील आहे.
एवढा काळ लोटल्यानंतरही पोलिस व्हायचेच..ही तिच्या मनातली जिद्द कायम होती. वर्षभर कसून सराव करत शीतलने भरतीमध्ये बाजी मारत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. त्यामुळे तिची माहेरी आणि सासरी चांगलीच चर्चा रंगली आहे. शीतलवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शीतल सांगतात की,लग्नानंतरही काहीतरी करायचं ठरवलं. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलिसात भरती होऊन दाखवले. प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका महिलेचा हात असतो असे म्हणतात, पण शीतलच्या यशामागे तिचे पती प्रमोद यांचा हात व आई वडील अन् सासू, सासरे यांचा भक्कम पाठिंबा आहे.
त्यांनी शीतलला प्रत्येक अडचणीत साथ दिली. शीतलच्या इच्छाशक्तीमुळे सर्व काही शक्य झाल्याचे अभियंता असलेले तिचे पती प्रमोद सांगतात. शीतलची नियुक्ती मुंबई येथे झाली आहे. तिला शौर्य करिअर अकडमीचे संचालक संजय आहेर व सचिन आहेर यांचे सहकार्य मिळाले आहे.
"सुरवातीपासून काहीतरी करावे ही माझी इच्छा होती. लग्नानंतर भरती झाली नाही, मध्ये कोरोना आला, पण मी आशावाद जपला होता. नुकत्याच झालेल्या भरतीत ही संधी मिळवण्याचा निर्धार करत मी तयारी केली.
लहान मुलीला सांभाळून ही जबाबदारी पार पाडताना मला आई- वडील, सासू- सासरे अन् माझे पती प्रमोद पवार यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन मोलाचे ठरले."
- शीतल चव्हाण/पवार, नवनियुक्त पोलिस.