Shiv Jayanti 2023: सातासमुद्रापार रशियात शिवजयंती साजरी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

students studying medicine at Osh State Medical University in Russia celebrated the birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj wearing traditional costumes.

Shiv Jayanti 2023: सातासमुद्रापार रशियात शिवजयंती साजरी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

सटाणा (जि. नाशिक) : सातासमुद्रापार असलेल्या रशियामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती महाराष्ट्र राज्य विद्यार्थी संघटनेच्या वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी हाती भगवा ध्वज घेत केलेला ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा जयघोष महाआरती, शिवगर्जना, पारंपारिक महाराष्ट्रीयन सांस्कृतिक कार्यक्रम हे विशेष आकर्षण होते. दरम्यान, या शिवप्रेमी मराठी विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं कौतुक केलं. (Shiv Jayanti 2023 CM interacts with students celebrating Shiv Jayanti in Russia nashik news)

रशियाच्या ओश स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये सध्या १२०० मराठी तरुण वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. १० वर्षांपूर्वी मोजक्या विद्यार्थ्यांनी या मेडिकल युनिव्हर्सिटीच्या लहान वसतिगृहामध्ये शिवजयंतीची सुरवात केली होती.

ही परंपरा यंदाही कायम ठेवत सर्व विद्यार्थ्यांनी ओश मधील कॅफे एल्डरडो ग्रँडच्या भव्य सभागृहात शिवजयंती साजरी केली. त्यासाठी विवेक औताडे (नाशिक) व धनंजय कोकाटे (येवला) यांच्यासह नाशिक, बुलढाणा, मुंबई, कोल्हापूर, नागपुर, सोलापूर, संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर व सातारा भागातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

या सोहळ्यास विद्यापीठाचे प्रमुख डीन डॉ.रोमन, भारताचे प्रतिनिधी डॉ.भूपेंद्रकुमार मगरदे व डॉ.वसीम (पाकिस्तान) हे प्रमुख पाहुणे होते. डॉ.मगरदे यांच्या हस्ते महाराजांच्या पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अभिषेक काशीद याने शिवगर्जना, सलोनी मनोजकुमार व राधिका मौले यांनी सांस्कृतिक कार्यक्रम तर रोहन राणे, कृष्णा पवार, अथर्व गडवजे, शाम पाटील यांनी भगवा झेंडा नृत्य सादर केले. गौरव पाटील याने दिग्दर्शित केलेल्या महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी भगवे कपडे तर विद्यार्थिनींनी परिधान केलेल्या पारंपारिक साड्यांची वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हर्षल गवळी याने शिवरायांच्या पराक्रमी इतिहासावर भाषण केले.

या सोहळ्यात अथर्व ततार, पुष्पक पाटील, तेजस शिर्के, शुभम गजभे, संकेत कांबळे, पीयूष दौड, वेदांत थेटे, कृष्णा पवार, पीयूष मलंडकर, अनिकेत चौधरी, शुभम जगताप, तृप्ती शिंदे, किर्ती रेंगडे, सायली शेंगाणे, वेदिका बागूल, सायली कायस्थ, वैष्णवी चव्हाण, अनघा कुलधरण, अभिषेक भायकर, हर्ष वाघ, चैतन्य सोनवणे, अनिकेत गावडे, ऋषिकेश जाधव आदि विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सुधांशु ढोलेकर (बुलढाणा) याने सूत्रसंचालन केले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे या सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यासाठी श्री परब (मुंबई) या विद्यार्थ्याने पुढाकार घेतला. "आपण आपल्या मातृभूमीपासून लांब राहून आपला अभ्यास आणि बाकीच्या गोष्टी सांभाळून शिवजयंती साजरी करत आहात हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

मी तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो'', असे मुख्यमंत्र्यांनी या भावी डॉक्टरांना सांगितले. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या या संवादामुळे सातासमुद्रापार शिवप्रेम व्यक्त करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आपला शिवजयंतीचा उत्साह द्विगुणित केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.