Shiv Jayanti 2023 : शिवरायांच्या घोषणेने दुमदुमली सिन्नरनगरी; पालखीसह मिरवणुकीने वेधले लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women and young women participating in the bike rally. Malkhamb athletes performing breathtaking feats.

Shiv Jayanti 2023 : शिवरायांच्या घोषणेने दुमदुमली सिन्नरनगरी; पालखीसह मिरवणुकीने वेधले लक्ष

सिन्नर (जि. नाशिक) : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने मोठ्या उत्साहात करण्यात आली.

यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीतील चित्ररथ, जिवंत देखावे, ढोल ताशांचा गजर, भगवे ध्वज तसेच, मावळ्यांनी सादर केलेल्या शौर्याविष्कार, मल्लखांब आदी मर्दानी खेळांनी शहरवासीय अचंबित झाले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात फुलांची सजावट सर्वांचे लक्षवेधक ठरली. छत्रपती शिवाजी महाराज की जय’, जय भवानी-जय शिवराय ’ अशा गगनभेदी घोषणांनी अवघे शहर दुमदुमले होते. (Shiv Jayanti 2023 procession with palanquin attracted attention nashik news

आमदार माणिकराव कोकाटे, शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे, माजी अध्यक्ष विठ्ठलराजे उगले, माजी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, शिवजन्मोत्सव समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र जगझाप, सुभाष कुंभार, राजाराम मुरकुटे, हरिभाऊ तांबे, भाऊसाहेब पवार, रवी मोगल, भाऊसाहेब शिंदे, दत्तात्रय वायचळे, भारत सोनवणे, समर्थ चोथवे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी चौक (आडवा फाटा) येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला.

मिरवणुकीत माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती ॲड. राजेंद्र चव्हाणके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, द्राक्षे बागायतदार संघाचे संचालक शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल,

राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, शिवमावळे मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णानंद कासार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य संघटक सचिव रवींद्र काकड, वामन पवार, राजेंद्र रायजादे, अनिल वराडे, पंकज जाधव, अनिल कर्पे, किरण गोजरे, यतीन भाबड आदींसह तालुक्यातील विविध संस्था,

राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शाळा, महाविद्यालयातील तरुण, शहरातील पुरुष, महिला भगिनी सहभागी झाले होते. राजेशाही प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यतीन भाबड व यांच्या सर्व सहकाऱ्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

मिरवणुकीत देखाव्यांनी वेधले लक्ष

मिरवणुकीत शिवरायांचे पुतळे तसेच शिवराज्याभिषेक, शिवजन्मोत्सव, वीर जवान आदी ऐतिहासिक जिवंत देखावे सादर करण्यात आले होते. मिरवणुकीत तरुण मर्दानी खेळ दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीयुद्ध, असे शौर्यकौशल्य सादर करत होते, संबळ, ढोल-ताशा पथक, लेझीम पथक, झेंडा पथक, झांज पथक मिरवणुकीची शोभा वाढवत होते.

महिलांची दुचाकी रॅली

वारकरी पथक, महिला बाईक रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसले. महत्त्वाचे म्हणजे सर्व ठिकाणी तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशात बालगोपाळ मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ढोल-पथक, संबळच्या तालावर तरुणांसह सहभागी महिला-भगिनीही नृत्य करत होत्या. लहान मुलांनी सादर केलेला शौर्याविष्कार डोळे दिपवणारा ठरला. मिरवणुक बघण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती.

मिरवणुकीत उत्साह शिगेला

आडवा फाटा येथून सुरु झालेली मिरवणूक बस स्थानक परिसरात येताच येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मिरवणुक पुढे सरकली. नेहरू चौक, लालचौक, शिंपी गल्ली, भिकुसा कॉर्नर, गणेश पेठ मार्गे मिरवणुक छत्रपती शिवाजी चौकात पोचली.

तेथे सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने शिवरायांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पुढे सरकलेली मिरवणुक वावीमार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोचल्यानंतर अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर मिरवणुकीचा समारोप झाला. शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोचला. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

टॅग्स :Shiv JayantiNashik