
Nashik News: श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ संस्थेकडून कोणत्याही प्रकल्पाला जागा देण्यास विरोध
नाशिक : श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ संस्थेतर्फे कोणत्याही प्रकल्पासाठी जागा देण्यास अथवा संपादन करण्यास विरोध करण्यात आला आहे. याशिवाय सध्या औद्योगिक क्षेत्रासाठी जागा घेण्यासंबंधीच्या चर्चेचा निषेध नोंदवण्यात आला आहे.
नाशिककरांचा ऑक्सिजन हॉटस्पॉटकडे हेतूपुरस्कार काणाडोळा केला जात आहे. शिवाय औद्योगिक क्षेत्रासाठी जागा नाही हे अर्धसत्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विश्वस्त संस्था १४४ वर्षांची असून ‘ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया’ कडे नोंदणीकृत आहे. संस्थेच्या नाशिकमध्ये तीन गोशाळा असून, चौदाशे गायी आहेत. त्यातील २५० गायी दूध देतात. सर्व गायी संस्था स्वखर्चाने आजीवन सांभाळते.
दरम्यान, आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी उद्योगांच्या विकासासाठी, विस्ताराकरिता नाशिकमध्ये जागेची अडचण असल्याचे सांगत उद्योग मंत्र्यांनी सातपूर औद्योगिक क्षेत्रालगतची संस्थेची ८२५ एकर जागा उद्योगांसाठी बाजारभावाप्रमाणे संपादन करावी, संस्थेला ग्रामीण भागात जमीन विकत घेतली जाऊ शकते असे विधानसभेत मत नोंदवले, असे नमूद करत श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ संस्थेतर्फे गुरुवारी (ता.२३) निवेदन प्रसिद्धीला देण्यात आले आहे.
संस्थेचे चुंचाळे, सारूळ, बेळगाव ढगा हे क्षेत्र जैवविविधता म्हणून ओळखले जाते. इथे वृक्षराजी, ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ चे २६ शेततळे, जलचर, गांडूळखत प्रकल्प, मधमाशी पालन, गाईसाठी प्रमाणित सेंद्रिय पशुचारा उत्पादन, ४५० किलोवॉटचा सौर विद्युत निर्मिती प्रकल्प, पशू-पक्ष्याचा अधिवास, गोशाळा आहे. हे क्षेत्र पर्यटन संचलनालयाद्वारे ‘ॲग्रो टुरिझम’ मध्ये एक दिवसीय सहल केंद्र म्हणून नोंदणीकृत आहे.
परंपरागत सेंद्रिय शेतीचे ज्ञान व जैवसाखळीचे पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व याचे ज्ञान व माहिती पर्यटकांना विनामूल्य देण्यात येते. संस्थेने हे क्षेत्र विकत घेतलेले आहे. सरकारने अथवा इतर कोणी दिलेले नाही. महसूल विभागाकडे त्याचे दप्तर आहे. सरकार, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले.
तरीही सध्या खोटारडेपणा व संस्थेसह विश्वस्तांची प्रतिमा मलिन करण्याचा उद्देश आहे. त्यातून संस्थेने, विश्वस्तांनी चुंचाळे व इतर जागांचे विक्री व्यवहार ‘बिल्डर'शी केले असे म्हटले गेले, असे नमूद करत संस्थेने निवेदनात ते नाकारले आहे.
भरपूर रिकाम्या जागा उपलब्ध
नाशिकलगत आणि नाशिकमध्ये भरपूर रिकाम्या जागा उपलब्ध आहेत. बंद पडलेल्या उद्योगांचे मोकळे भूखंड, उद्योगांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या उद्योगांच्या जागा, स्थलांतरित उद्योगांचा जागा एवढे पर्याय उपलब्ध असताना पर्यावरणाचा ऱ्हास करून कोणता शाश्वत औद्योगिक विकास साधला जाणार, असा प्रश्न संस्थेने उपस्थित केला आहे.